कात्रज –राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी मला कोणतीही ऑफर दिलेली नाही. मी पूर्वीपासूनच सांगत आलो आहे की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे, असे मनसेचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितले.
एका कार्यक्रमात आमदार रोहित पवार आणि मनसेचे वसंत मोरे यांची भेट झाली. त्यावेळची छायाचित्रे सोशल मीडियावर गेली दोन दिवस फिरत आहेत. रोहित पवार हे मोरे यांच्या कानात काही तरी सांगत असल्याचे छायाचित्र आहे. यावर अनेक राजकीय अंदाज आणि आखाडे बांधले जात असताना मोरे यांनी मात्र पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करीत मनसेतच असल्याचे सांगितले.
सध्याच्या घडामोडी पाहता मनसेचे पदाधिकारी आणि मोरे यांच्यात फारसे जमत नसल्याची चर्चा आहे. त्यातच एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आमदार रोहित पवार हे वसंत मोरे यांच्या कानात काहीतरी बोलत असल्याचे छायाचित्र “व्हायरल’ झाले. याबाबत वसंत मोरे यांनी सांगितलं की, रोहित पवार मला म्हणाले की, तात्या तुम्ही अतिशय चांगली भूमिका घेतली तुम्ही मनसेत राहिलात. त्यांनी मला ऑफर दिलेली नाही, उलट त्यांनी सांगितले की, तुम्ही योग्य वेळी योग्य भूमिका घेतली ते बरोबर केले. यावर मी त्यांना म्हणालो की, मी माझी भूमिकाच बदलली नव्हती, मी अगोदरपासूनच सांगितलं आहे की, की मनसेत आहे आणि मनसेतच राहील, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर….
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे शहर दौऱ्यावर आहेत. मनसेमध्ये सुरू असलेले वादविवाद तसेच वसंत मोरे यांची नाराजी नाट्य यावर या दौऱ्यात चर्चा होऊ शकते. त्यामुळे मनसेच्या बैठकीत राज ठाकरे नेमके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.