कात्रज येथील कार्यक्रमात खासदार डॉ. कोल्हे यांची माहिती
कात्रज – पुणे महानगरपालिकेच्या कामकाजावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे बारीक लक्ष असून त्याबाबत विरोधकांनी काळजी करू नये. महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच सत्ता येणार आहे, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
कात्रज परिसरातील महादेवनगर येथे उभारण्यात आलेल्या नवीन पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीला जोडून पाण्याची नवीन एक्स्प्रेस लाइव्ह टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच सुखसागरनगर भाग-1 करिता कात्रज-कोंढवा रोड ते गंगा ओशियन सोसायटीपर्यंत 400 मी.मी. व्यासाची स्वतंत्र पाण्याची एक्स्प्रेस लाइन टाकणे, महावीरनगर ते प्रेरणा हॉस्पिटलपर्यंत 300 मी.मी. व्यासाची स्वतंत्र पाण्याची एक्स्प्रेस लाइन टाकणे आणि सुखसागर नगर भाग-2 करिता कात्रज कोंढवा रोड ते खंडोबा मंदिरपर्यंत 400 मी.मी. व्यासाची पाण्याची स्वतंत्र लाइन टाकणे या कामांचे भूमिपूजन अंबामाता मंदिर चौकात खासदार कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार कोल्हे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी कामाचा सपाटा लावला आहे. यातूनच पुणे महापालिकेचा निकालसुद्धा महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादीच्या बाजूने लागेल, असा विश्वास वाटतो.
यावेळी नगरसेवक प्रकाश कदम यांनी विरोधकांवर टीका करत, त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला तर, मगराज राठी व प्रतिक कदम यांनी आभार मानले. यावेळी माजी नगरसेविका भारती कदम, प्रतीक कदम, महेश कदम, सुधीर डावखर, रमेश सोनकांबळे, चंद्रकांत हंडाळ, चंद्रकांत कदम, रमेश कदम, अनिल ढवण, दीपक गुजर, अर्जुन निंबाळकर, पूनम पाटील, जितू चव्हाण, संजय खोपडे, संतोष बालवडकर, बाळासाहेब खंदारे, राकेश कामठे, बाळासाहेब कवडे आदी उपस्थित होते.