पवारांची मशागत अन् पाटलांची राखण

सत्ता बदलाने बदलली समीकरणे : “कामगारनगरी’ला न्याय मिळणार का?

“पाटीलकी’चा होईल का फायदा?

भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण असले तरी चंद्रकांत पाटील त्यास अपवाद ठरले आहेत. महसूलमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आता भाजप प्रदेशाध्यक्ष अशी पदांची खैरात त्यांच्यावर झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामासह, शास्ती कर, पूररेषा, नदी सुधार प्रकल्प, औद्योगिक भागातील समस्या असे राज्य शासनाशी संबंधित अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. “मोदी-शहा टीम’पैकी आता ते देखील एक आहेत. त्यामुळे केंद्र शासनाशी संबंधित “रेडझोन’, “एच. ए.’ सारखे प्रश्‍नही धसास लावणे त्यांच्यासाठी अवघड नाही. या प्रश्‍नांची सोडवणूक चंद्रकांत पाटील कशा पद्धतीने करतात, याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड “कामगारनगरी’ची मशागत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. 15 वर्षांच्या सत्ताकाळात पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे कारभारी अजित पवार यांनी खतपाणी घातले. परंतु, शहरवासियांनी सत्ताबदल करीत भाजपकडे “राखण’ सोपविली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अन्‌ भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या हाती आता कामगारनगरीची राजकीय सूत्रे आली आहेत. पवारांची सद्दी संपून पाटलांचा राजकीय उदय शहराच्या राजकारणात झाला आहे. शहराचे प्रश्‍न अन्‌ राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेल्यांच्या अपेक्षा “चंद्रकांतदादा’ पूर्ण करणार का, याबाबत शहरात चर्चा रंगली आहे.

शरद पवार आणि पिंपरी-चिंचवड कामगारनगरी यांचा एकमेकांशी खूप जुना संबंध आहे. विद्यार्थी दशेपासून ते शहराशी जोडले गेले आहेत. अण्णासाहेब मगर यांनी पिंपरी-चिंचवड कामगारनगरीचा पाया रचना तर त्यावर कळस रचण्याचे काम शरद पवार यांनी केले. कालांतराने त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराची सूत्रे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात सोपवली. अजित पवार यांनीही त्यांचा विश्‍वास लिलया पेलला. पिंपरी-चिंचवडचा झालेला सुसज्ज विकास हे त्याचेच द्योतक आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दिसणारे प्रशस्त व चकाचक रस्ते, उद्याने, उड्डाणपूल असा शहराचा विकास अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून होत गेला. रस्ते, वीज आणि पाणी या पलिकडे जात राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न केला.

औद्योगिक परिसराच्या विकासापासून ते शहरात नामांकित शैक्षणिक संस्था आणण्यापर्यंत शरद पवार व अजित पवार यांचा मोलाचा वाटा आहे. बजाज ऑटो, फोर्स मोटर्सचा लढा, एच. ए. कामगारांचे प्रश्‍न शरद पवार यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले. जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत (जेएनएनयुआरएम) पिंपरी-चिंचवड शहराला मोठ्‌या प्रमाणावर त्यांनी निधी मिळवून दिला. अनधिकृत बांधकाम असो अथवा रेडझोन या प्रश्‍नांचा पाठपुरावा करण्यात ते कमी पडले नाहीत. या शहरावर शरद पवार यांनी वडिलकीची माया केली. तर अजित पवार यांनी बंधुप्रेमाचे कर्तव्य बजावले. अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांच्या पंक्तीत बसविले. परंतु, कुरघोड्यांची “पवारनिती’ मागील लोकसभा निवडणुकीत पवारांवर “बुमरॅंग’ झाली.

लोकसभेपाठोपाठ, विधानसभेला अपयश आले. या अपयशातून सावरत नाही तोच महापालिकेला मोठा फटका सहन करावा लागला. त्यातही नेत्यांच्या पंक्तीत बसविलेल्या त्यांच्या शिष्यांनीच “गुरुची विद्या गुरूला’ दिली. यातून सावरत यावेळच्या लोकसभा निवडणुकीत आपल्याच कुटुंबातील उमेदवार लादण्याची “घोडचूक’ पवारांनी केली. त्यामुळे पुन्हा एकदा हाताने पराभव ओढावून घ्यावा लागला. बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे.
आगामी विधानसभेच्या तोंडावर अजित पवार पराभव पचवून कामाला लागण्याची गरज आहे. एकीकडे पवारांची सद्दी धोक्‍यात असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांचा शहराच्या राजकीय पटलावर उदय होत आहे, त्यामुळे शहरवासिय कोणाला साथ देणार हे येत्या विधानसभेत समोर येईल.

पालकमंत्री या नात्याने पाटलांकडे पिंपरी-चिंचवडची सूत्रे देण्यात आली आहेत. पवारांचे कट्टर वैरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यातच आता त्यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचे बळ मिळाले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेली नेतेमंडळीच आज भाजपमध्ये आहेत. एकेकाळी पवारांच्या “हुकुमाचे ताबेदार’ असलेल्यांना आता “पाटीलकी’चा सामना करायचा आहे. तिकीट वाटपापासून ते पद वाटपापर्यंत सारी सूत्रे भाजपने पाटलांवर सोपविली आहेत. भाजपकडे एकहाती सत्ता असली तरी निष्ठावंत व “आयाराम’ ही दरी कायम आहे. त्यातही नेत्यांचे अनेक गट-तट तयार झाले आहेत. त्यांची सांगड घालण्यात पाटलांना यश येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)