“पवारांचं कुटुंब मोठं; मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटलांचा नंबर लागणे अवघडच”

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी एका स्थानिक वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत आपली मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली होती. यावरून आता विरोधी पक्षातील नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जयंत पाटील यांच्यासह शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांचा नंबर लागणे फार कठीण आहे. वास्तविक पाहता, शरद पवार यांचे कुटुंब फार मोठे आहे. संपूर्ण कुटुंबाला संधी देता देता अनेक वर्षे निघून जातील. त्यामुळे जयंत पाटील यांना साधारणत: १०० वर्षांपेक्षा अधिक आयुष्य ईश्वराकडे मागावे लागेल. त्यासाठी त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले. तरी पाटील यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असेल तर आम्हाला आनंद आहे. पण मला वाटत नाही, राष्ट्रवादीमध्ये त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.

यापूर्वी, जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली होती. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ 54 आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे, असं पाटील म्हणाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.