मला अडचणीत आणण्याचे “पवारी’ षड्‌यंत्र – शिवतारे

भ्रष्टाचाराचे आरोप सूडबुद्धीने

वाघापूर – “लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार अजित पवार यांच्या जिव्हारी लागला होता. विजय शिवतारे पुन्हा आमदार कसा होतो, तेच बघतो, अशा शब्दांत त्यांनी मला जाहीर धमकी दिली होती. जलयुक्त शिवार योजनेबाबत सध्या होत असलेले आरोप हे त्याच वक्तव्याचा पुढील अंक आहे. मला अडचणीत आणण्याकरिता पवारांचे अर्थातच राष्ट्रवादीचे व्यापक षड्‌यंत्र असून 43 कोटींच्या कामात 200 कोटींचा घोटाळा कसा होऊ शकतो?’ असा सवाल राज्य जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे.

राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर विधान परिषदेत अधिवेशनात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. याबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडण केले आहे. ते म्हणाले, “तालुक्‍यात 43 कोटींची जी कामे झाली ती अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने झाली आहेत. विशेष म्हणजे जे कंत्राटदार आहेत, ते सर्व कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत, ज्यांनी गैरव्यवहार केले त्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही.’ “पुरंदर तालुक्‍यातील जलसंधारणाची कामे चांगली झाली असल्याचे तक्रारकर्त्याने आपल्या अर्जात म्हटले आहे.

अर्जदाराची तक्रार ही कृषी विभागाच्या कामांबाबत आहे. परंतु, कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते लोकांना वस्तुस्थिती कळू देत नाहीत. त्यामुळे लवकरच आम्ही यातील वास्तव कागदपत्रांसह लोकांसमोर मांडणार आहोत. ओढून ताणून कृषी विभागाच्या कामांशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. तक्रारीत स्पष्टपणे कृषी विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांचे संगनमत असल्याचे नमूद केले आहे आणि बहुतांश ठेकेदार हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचेच आहेत, असेही शिवतारे म्हणाले.

पवारांची धुणीभांडी करणाऱ्यांना…
माझ्यावर आरोप करणारे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते हे दारू, मटका, सावकारी अशा अवैध धंद्यांमध्ये निष्णात आहेत हे संपूर्ण तालुक्‍याला माहीत आहे. पुरंदर तालुक्‍यात जलसंधारणाची, रस्त्यांची आणि पायाभूत सुविधांची बेसुमार कामे झाली आहेत. हा सगळा बदल जनता पाहत आहे. पण ज्यांना इतकी वर्ष पवारांची धुणीभांडी करूनही भरीव काम करता आले नाही त्यांना यानिमित्ताने एक मुद्दा मिळाला, पण तो फोल ठरला, अशी टीका शिवतारे यांनी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)