नाशिक – सध्या संपावर असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांची आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांविषयी चर्चा केली. विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीत या कामगारांच्या प्रश्नावर सरकारशी बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन पवारांनी त्यांना दिले.
गेल्या 14 ऑक्टोबर पासून या कंपनीच कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. या संपकऱ्यांच्या प्रतिनिधींना पवारांनी सांगितले की कंपनीच्या बंगलुरू, नाशिक आणि लखनौ या तिन्ही ठिकाणच्या युनियन मधील प्रत्येकी दोन प्रतिनिधी मला दिल्लीला येऊन भेटा.
त्यावेळी यातून कसा मार्ग काढायचा यावर विचार करू आणि त्या अनुषंगाने सरकारशीही बोलणी करू असे आश्वासन पवारांनी या कामगार प्रतिनिधींना दिले. वेतनातील तफावत दूर करण्याची तसेच वेतन वाढीची नवी श्रेणी निश्चीत करण्याची या कामगारांची प्रमुख मागणी आहे.