माझ्या कुटुंबाला पवारांनी नावे ठेऊ नयेत – नरेंद्र मोदी

संपूर्ण देशच माझे कुटुंब

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील भाजपच्या व्यासपीठावर

सोलापूर – माझ्या कुटुंबाला शरद पवारांनी नावे ठेऊ नयेत. संपूर्ण देशच माझे कुटुंब आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगाविाला. परिवारव्यवस्था देशाची मोठी देणगी आहे. परिवाराच्या विषयात वयाने मोठे असलेले पवारांना बोलण्याचा हक्क असल्याचा खोचक टोलाही मोदींनी लगावला. परिवार ही माझी प्रेरणा आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, महात्मा फुले, चाफेकर बंधू, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर तसेच वल्लभभाई पटेल ही मोठी परिवार आहेत. या परिवाराच्या त्याग आणि तपस्येतून आम्ही प्रेरणा घेतली आहे. यशवंतराव चव्हाणांच्या परिवाराची आपण प्रेरणा घ्या. पवार आपल्या समाज व संस्कारानुसार बोलतात, असे सांगत मोदींनी कुटुंबाबाबत पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

माढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी अकलूज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधानांनी शरद पवार, विरोधक आणि वैयक्तिक आरोप करणाऱ्यांचा समाचार घेतला. यावेळी मोहिते पाटलांनी मोदींचा फेटा व घोंगडी देऊन सत्कार केला. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी आणलेले मोदी जॅकेट पंतप्रधानांनी अंगात घालून संपूर्ण भाषण केले.

विजयसिंहांचा प्रवेश अडला
राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घड्याळ रामराम ठोकत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्यानंतर माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील भाजपात कधी प्रवेश करणार याकडे सर्वांचे डोळे लागले होते. बुधवारच्या पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जाहीर सभेवेळी विजयदादा व्यासपीठावर दिसले. मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केला नाही. राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्‌दल व अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे विजयदादांचा भाजप प्रवेश कुठे अडला, याबद्‌दल राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री सदाभाऊ खोत, महादेव जानकर, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार अमर साबळे, माढाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, बारामती मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल, आमदार राहुल कुल, आमदार प्रशांत परिचारक, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, शरद पवार खूप चांगले खेळाडू आहेत. हवा बघून ते निर्णय घेतात. पराभव दिसत असल्यानेच त्यांनी माढा मतदारसंघातून पळ काढला. पवार स्वतःचे कधीच नुकसान होऊ देत नाहीत. दिल्लीचे एकच कुटुंब पवारांची प्रेरणा आहे. त्यांच्याकडून शिकतात आणि त्याचीच ते सेवा करतात, असे म्हणत गांधी घराण्याचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केला.

मुख्यमंत्री होऊनही आपण पाणी देऊ शकला नाहीत. पाणी हे राजकारणाचे हत्यार असू नये, असेही ते म्हणाले. मोदींनी पुन्हा एकदा ओबीसी कार्ड काढत राहुल गांधींनी आपली जात काढली आहे. खालच्या जातीचा असल्याने आपल्याला बदनाम करण्यात येत असल्याचे सांगत मोदींनी जनतेला भावनिक आवाहन केले. कॉंग्रेसचे नामदार देशवासियांना शिव्या घालत आहेत. “चौकीदार चोर है’ नंतर आता विरोधक हैसियत व जात दाखविण्यातसुद्धा मागे पडलेले नाहीत. मी शिव्यांना घाबरत नाही. मात्र दलित, पीडित,शोषितांना अपमानीत करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर देश आणि आपण त्यांना सोडणार नाही, असा इशारासुद्धा मोदींनी यावेळी दिला.

कृष्णा-भीमा स्थिरीकरण होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या सिंचनासाठी सुमारे 35 हजार कोटी दिले आहेत. शिवाय कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी जेवढा पैसे लागेल तेवढा पैसा आपण त्यांच्याकडून आणु असे सांगत स्थिरीकरण योजना पूर्ण करू असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. माढा परिसरातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामुळे गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे. मुंबईत एक अरबी समुद्र, तर दुसरा जलसमुदाय माढ्यात दिसतोय असे मुख्यमंत्र्यांनी समोरच्या विशाल गर्दीकडे पाहत सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.