पक्षांतराच्या निर्णयाचे पवारांनी आत्मपरीक्षण करावे

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत राजकारण करणाऱ्यांना लक्षात ठेवेन
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची थेट नाराजी उघडपणे व्यक्‍त – राजकीय कुरघोड्यांमुळे राष्ट्रवादीला केला रामराम

सातारा – कै. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्या घराण्याने गेल्या पंचेचाळीस वर्षापासून आधी कॉंग्रेस नंतर राष्ट्रवादी पक्षांच्या धोरणांची पाठराखण केली. मात्र तरीही अंतर्गत कुरघोड्या करून आम्हाला वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, याची वेळोवेळी कल्पना मी शरद पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

गत विधानसभा निवडणुकीत साताऱ्यात मी दगा-फटक्‍यांचा मोठा अनुभव घेतला आहे. आम्ही पक्ष सोडला लगेच आमच्या विरोधकांनी जाऊन लगेच पवार साहेबांशी गुफ्तगू केले. पक्षांतराचा निर्णय आम्ही आज घेतला नाही. त्यामागे मोठी पार्श्‍वभूमी आहे, याचे राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी नक्की आत्मपरीक्षण करावे अशी स्पष्ट नाराजी सातारा-जावली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

मुंबईत झालेल्या भाजप प्रवेशानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रथमच साताऱ्यात सुरूची येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली, ते म्हणाले, मी पुण्याला पवारांकडे बैठकीला गेलो होतो मात्र मी राष्ट्रवादीतच राहणार असे जे पवार साहेब म्हणत आहेत ते मी बोललोच नाही माझ्यासमवेत आमदार मकरंद पाटील सुध्दा होते. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान आणि त्यानंतर सुद्धा मला ज्या राजकीय अडचणींना तोंड द्यावे लागत होते याची कल्पना मी वेळोवेळी शरद पवार साहेबांना दिली होती. सातारा तालुक्‍यातील लिंब, शेंद्रे, परळी या तीन गटातून उदयनराजेंना आम्ही बेचाळीस हजारांचे मताधिक्‍य दिले तरीही आम्ही लोकसभा निवडणुकीत काम च केले नाही असे संशयाचे वातावरण निर्माण करण्यात आले. उदयनराजेंचा विरोध या प्रश्‍नांचा गुंता नुसत्या चर्चेने सुटणारा नव्हता, त्यांच्या राजकीय तिकडमबाजीमुळे ज्या अडचणी निर्माण झाल्या त्याचा धोका आम्ही आधीच ओळखला होता त्यांच्या तऱ्हेवाईक वागण्याची जवाबदारी घेणार कोण ? हा खरा वादाचा मुद्दा आहे.

मी पक्षांतर करून चोवीस तास उलटण्याच्या आत आमच्या विरोधकांनी सर्किट हाऊसवर पवारांकडे हजेरी लावली. म्हणजेच असणारा सुप्त विरोध उघडपणे समोर आला अशा थेट भाषेत शिवेंद्रसिंहराजे यांनी राजमाता कल्पना राजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. मी राष्ट्रवादीत असताना पक्षादेश मानला, वरिष्ठांना मान देत जवाबदारीने काम केले प्रत्येक घटकाला ताकद देण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी शिवेंद्रसिंहराजेंची वेळ यायची त्यावेळी राजकीय कुरघोडया चालायच्या. आत्ताही भाजपच्या अमित कदम यांनी घेतलेल्या मेळाव्यांचे राजकीय ब्रेन काय आहेत हे स्पष्टपणे दिसतयं अशा संभाव्य धोक्‍यांना ओळखूनच आम्ही पक्षांतराचा निर्णय घेतला. पक्षाला कर्नाटकातील आमदारांप्रमाणे अडचणीत सोडून गेलो नाही.

जेंव्हा होतो तेव्हा पक्षश्रेष्ठींनी म्हणावी तशी दखलं घेतली नाही आणि माझ्या भाजपप्रवेशाची इतकी राजकीय खळखळ कशासाठी. फक्त राष्ट्रवादीचा एक आमदार सातारा जावली मतदार संघाच्या विकासासाठी उठून भाजपमध्ये गेला त्यात इतकी चर्चा होण्याचे कारणच नाही. भाऊसाहेब महाराजांपासूनच आम्ही राष्ट्रवादीशी एकनिष्ठ बाणा जपला. मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या विचारांचे सरकार येईल सध्या अशी परिस्थिती नाही.

मी राष्ट्रवादीत राहून पराभूत झालो असतो तर पक्षाने मला अजिबात विचारले नसते मतदार संघाच्या विकासासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजेंच्या कुरघोड्यांवर तोडगा निघेल अशी परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही पक्षांतर केले याचे शरद पवार साहेबांनी जरूर आत्मपरीक्षण करावे असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

प्रसंगी अध्यक्षपदाचा राजीनामा देईन
जिल्हा बॅंकेची रिक्त संचालकाची जागा आ. मकरंद पाटील यांच्या रूपाने शिवेंद्रराजेंच्या अनुपस्थितीत भरण्यात आली. ही अविश्‍वास ठरावाची तयारी आहे का? यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षात मी कधीच पदाची अपेक्षा केली नाही. इतरांच्या सहकार्याने व सूचनेने ते पद माझ्याकडे चालत आले. मला पदाचा कोणताच हव्यास नाही. वेळ पडल्यास आणि मागितला गेल्यास मी पदाचा राजीनामा सुध्दा देईन. मी यापूर्वी दोन वेळा पदाची मागणी केली होती मात्र त्यांची दखल घेण्यात आली नाही.

जिल्हा बॅंकेचे राजकारण वेगळं असते. संचालकांच्या सहकार्याने मी बॅंक उत्तम चालवली. मात्र येथे राजकारण करणाऱ्याला मी चांगलाच लक्षात ठेवेन. जे आखाडीच्या मेजवानीला होते आणि नंतर ते पवारांना जाऊन भेटले. या गोष्टी माझ्या स्पष्ट लक्षात आहे, त्यावेळी वेळ काळ बघून काय तो निर्णय घेऊ असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. मी आमदारच आहे बोंडारवाडी धरण, महाराष्ट्र स्कूटर्स, तिसरी एमआयडीसी, साताऱ्याची हद्दवाढ या विकास कामांसाठी मी धडपडताना विरोधी पक्षांचे बंधन येत होते. लोकसभा निवडणुकांनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.

अमित कदम आणि दीपक पवारांची अडचण नाही
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमित कदम यांची मला कोणतीच अडचण नाही. जिल्हा परिषदेत सभापती पदांसाठी आम्हीच त्यांचे नाव सुचवले होते. राष्ट्रवादी कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा रामराजेंच्या सांगण्यावरून कदम यांना संधी देण्यात आली. अमित कदम, व दीपक पवार या भाजपमधील जुन्या नेत्यांची मला कोणतीही अडचण नाही. भाजपच्या जुन्या निष्ठावंतांचा सन्मान करत व त्यांना विचारात घेऊनच काम केले जाणार असल्याची स्पष्ट ग्वाही शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.