मुंबई : भारताच्या इतिहासात कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी जितके काम केले तितके कोणीची केले नाही. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पवारांचे काम समजून घेतले असते तर त्यांना प्रश्न पडला नसता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. शरद पवार साहेबांनी आयात करणाऱ्या देशाला निर्यात करणारा देश बनवला.
पिकांना चांगला हमी भाव दिला, फळबागांना अनुदान दिले, हॉर्टीकल्चरची सुरू केली. त्यामुळे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक घेत आहेत. कांदा, केळी अशा पिकांसाठी संशोधन केंद्र उभे केल्याचे सांगत अमित शहांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
जयंत पाटील म्हणाले, अमित शहा जर देशात फिरले तर त्यांना शेतकरी सांगेल की त्यांचा सातबारा पवार साहेबांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मदतीने कोरा केला. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर शेतकऱ्यांना त्यानंतर त्यांनी पॅकेजही दिले. एफआरपीचे धोरण आणले त्याची कडक अंमलबजावणी केली. त्यामुळे अमित शहा यांनी पवार साहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस करु नये. महाराष्ट्रासह देशातील जनतेला पवार साहेबांवर प्रचंड विश्वास आहे. तुम्ही प्रश्न उपस्थित केल्याने जनतेचा त्यांच्यावरील विश्वास कमी होणार नाही, असा टोलाही लगाविला.
अन्न धान्य उत्पादनात शरद पवार कृषिमंत्री असताना 60 दशलक्ष टन वाढ झाली. एकेकाळी अन्न-धान्याची आयात करणारा देश निर्यात करायला लागला. वाजपेयी काळात आधारभूत किमंती वाढलेल्या होत्या. 260 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन शरद पवारांच्या काळात झाले. 2013 मध्ये पहिल्यांदा भारताने 100 दशलक्ष टन तांदळाची निर्मिती केली. साऱ्या जगाने त्यावेळी वाहवाह केली. राष्ट्रीय फळबाग अभियान शरद पवारांनी सुरू केले. त्याचा फायदा देशांतर्गत गरज भागवून देशाला 14 हजार कोटी रुपये परकीय चलन मिळाले.