मुंबई : झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कमलेशकुमार सिंह यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकमेव उमेदवार विजयी झाला. आमदार बनल्यानंतर सिंह यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांची भेट घेतली. त्या सदिच्छा भेटीसाठी सिंह पुण्यात आले.
त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी पवार यांनी शुभेच्छा दिल्या. त्या भेटीची माहिती राष्ट्रवादीने ट्विटरवरून दिली. झारखंडमध्ये विरोधकांच्या महाआघाडीने सत्ता परिवर्तन घडवत भाजपला पराभूत केले. त्या महाआघाडीत झामुमो, कॉंग्रेस आणि राजदचा समावेश आहे.
मात्र, राष्ट्रवादीचा त्या महाआघाडीत समावेश नव्हता. आता सत्तारूढ महाआघाडीला राष्ट्रवादी पाठिंबा देणार की विरोधकाची भूमिका निभावणार ते तूर्त समजू शकलेले नाही.