pimpri । हरिनामाच्या जयघोषात दुमदुमली पवनानगरी

पवनानगर, – पवना विद्या मंदिर व लायन शांता मानेक पवना जुनिअर कॅालेज, कै सौ मिराबाई दशरथ भोंगाडे प्राथमिक विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यामुळे पवनानगरीला तीर्थक्षेत्र आळंदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सालाबादप्रमाणे शाळेने कार्तिकी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.
वारकऱ्यांची वेशभूषा केलेले एक हजार विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. काही विद्यार्थी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत मुक्ताबाई आदी संतांच्या वेशभूषेत दिंडीत आले होते. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २५ वर्षांपासून शाळेत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
मंगळवारी (दि.२६) पवना कृषक सहकारी संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ जाधव, माजी सरपंच सुरेखा जाधव यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतीमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले. तसेच प्रल्हाद कालेकर व विमल कालेकर यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले. शाळेतून सुरुवात झालेली दिंडी पवनानगर पाटबंधारे वसाहत येथून पवनानगर चौक, काले गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत नेण्यात आली.
दिंडीत भजन पथकासोबत लेझीम पथक, वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडी, पर्यावरण दिंडी समावेश होता. यावेळी १५० विद्यार्थीनींनी टाळांच्या ठेक्यात नादब्रम्ह व संताचा जीवनपट सादर केला. यामुळे पवनानगर परिसर भक्तीमय झाला होता. काले येथे मंदिरात आरती घेऊन व फराळ वाटप करत पालखीचा समारोप करण्यात आला. प्राचार्य भाऊसाहेब आगळमे व पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.





