पवना आणि इंद्रायणी जलप्रदूषणाच्या विळख्यात 

काय व्हायला हव्यात उपाययोजना
शहरात निर्माण होणाऱ्या सर्व सांडपाण्यावर व्हायला हवी प्रक्रिया
शहरात सर्वत्र सांडपाणी नलिकांचे जाळे उभारणे आवश्‍यक
रसायनमिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे
सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी मैलाशुद्धीकरण केंद्रांची उभारणी व्हावी

पिंपरी – शहरातील पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये नाल्यांद्वारे विनाप्रक्रिया मिसळणारे घरगुती सांडपाणी, उद्योगांतील रसायनमिश्रित सांडपाणी हे जलचरांसाठी धोकादायक ठरत आहे. दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी 85 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात पवना आणि इंद्रायणी नदीला बसलेला जलप्रदुषणाचा विळखा हा खूप मोठा आहे. त्याबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.

शहरामध्ये दररोज 312 दशलक्ष लिटर इतके सांडपाणी तयार होते. त्यातील 265 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर महापालिकेच्या 13 मैलाशुद्धीकरण केंद्रांमार्फत प्रक्रिया करण्यात येते. त्यानुसार सुमारे 85 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरातील लघुउद्योगांचे रसायनमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता नाल्यांद्वारे थेट नदीपात्रात मिसळत आहे.

पवना नदीकाठच्या नाल्यांमध्ये विशेषत: झोपडपट्ट्यांतून थेट जमा होणारे सांडपाणी येते. या सांडपाण्यामुळे नदीच्या प्रदुषणात भरच पडत आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत वैयक्‍तिक शौचालय उभारणी व त्यासाठी आवश्‍यक मलनिस्सारण नलिका टाकण्याचे काम सध्या 80 टक्के पूर्ण झाले आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात सांडपाणी वाहून नेण्यासाठी नव्याने एकूण 60 किलोमीटर अंतरात सांडपाणी नलिका टाकण्यात येणार आहे. तर, आवश्‍यक त्या ठिकाणी सुमारे 45 किलोमीटर वाढीव क्षमतेची सांडपाणी नलिका टाकण्याचे नियोजन आहे.

उद्योगांच्या सांडपाण्यावर अद्याप उपाय नाही
शहरातील लघुउद्योगांमधून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (कॉमन इफल्युएंट ट्रीटमेंट प्लॅन्ट) उभारणी होणे आवश्‍यक आहे. संबंधित केंद्राच्या उभारणीसाठी महापालिकेने विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे. हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर यांच्याकडे 2016-17 मध्येच सादर केला आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप पुढील कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यामुळे लघुउद्योगांतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर अद्याप उपाय सापडलेला नाही.

जलचरांना धोका
पवना नदीपात्रात केजुदेवी बंधारा येथे रसायनमिश्रित सांडपाणी सोडण्यात आल्याने पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटल्याने मासे मृत पावण्याची घटना घडली. चालू वर्षभरात दोनदा हा प्रकार उघडकीस आला. पहिली घटना फेब्रुवारीत तर, दुसरी घटना मे महिन्यात घडली. नदीतील वाढत्या जलप्रदुषणामुळे जलचरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत महापालिकेला नोटीस बजावून उपाययोजना करण्यास सांगितले होते. त्यानुसार महापालिकेकडून उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, अशा प्रकारे नदीपात्रात रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जाऊ नये, यासाठी सांडपाणी सोडणारे उद्योग, संस्था यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी नागरिकांची मागणी आहे.

महापालिकेतर्फे नदीच्या कडेला असलेल्या आणि नाल्यांना जोडणाऱ्या सांडपाणी नलिका बदलण्याचे काम चालू आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी पिंपळे निलख, चिखली येथे मैलाशुद्धीकरण केंद्राची उभारणी केली जात आहे. तर, पुनावळे आणि बोपखेल येथे नवीन केंद्र उभारण्याचे नियोजन आहे.

– मकरंद निकम, सह-शहर अभियंता, महापालिका.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.