पुणे – भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचे (एनआरएआय) सहमहासचिव, देशाच्या नेमबाजी संघाचे माजी प्रशिक्षक पवन सिंह यांची इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्टस फेडरेशनच्या (आयएसएसएफ) पंच समितीमध्ये सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
करोनामुळे आयएसएसएफच्या प्रशासक परिषदेने पहिल्यांदाच ऑनलाइन निवडणूक घेतली असून यात पवन सिंह यांना 75 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. ही निवडणूक दर दोन वर्षांनी घेण्यात येते. या 7 सदस्यीय पंच समितीमध्ये निवडीसाठी जगभरातून 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात पवन सिंह यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली. या महत्त्वाच्या समितीमध्ये स्थान मिळविलेले सिंह हे पहिले भारतीय आहेत. तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये जुरी मेंबर म्हणून काम पाहणारे देखील ते पहिलेच भारतीय ठरतील.
इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्टस फेडरेशनच्या वतीने गठीत करण्यात आलेली ही पंच समिती एक अध्यक्ष व 7 सदस्यांची असून जागतिक पातळीवरील नेमबाजीचे एक समान नियम, आंतरराष्ट्रीय पातळीवर पंचांना लागू होणारे नियम व मार्गदर्शक तत्त्वे याबाबत अहवाल तयार करते.