नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी पक्षाच्या खजिनदारपदी ज्येष्ठ नेते पवनकुमार बन्सल यांची नियुक्ती केली.
कॉंग्रेसचे संकटमोचक अशी ख्याती असणाऱ्या अहमद पटेल यांच्या निधनामुळे ते महत्वाचे पद रिक्त झाले. त्यामुळे बन्सल यांच्याकडे खजिनदारपदाची हंगामी जबाबदारी सोपवण्यात आली.
तसे असले तरी, नव्या नियुक्तीमुळे बन्सल यांचे पक्षातील महत्व अधोरेखित झाले आहे. बन्सल आधीपासूनच कॉंग्रेस महासमितीच्या प्रशासनचा प्रभार सांभाळत आहेत. मितभाषी आणि संयमी नेते अशी त्यांची ओळख आहे.
माजी केंद्रीय मंत्री असणारे बन्सल काही काळापासून फारशा प्रसिद्धीझोतात नव्हते. आता खजिनदार या महत्वाच्या पदाची जबाबदारी आल्याने ते कॉंग्रेसच्या आघाडीतील फळीत दिसण्याची चिन्हे आहेत.