पुणे – मुळा मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पातील (जायका प्रकल्प) कृषी महाविद्यालयातील बोटॅनिकल गार्डन येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाण देण्याची मागणी महापालिकेने महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे केली आहे. त्याच वेळी नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळानेही जैवविविधता वारसा क्षेत्रातून ही जागा वगळण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे या सांडपाणी प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे शहरातील प्रदूषित झालेल्या मुळा मुठा नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या (जायका) आर्थिक सहकार्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन मार्च २०२२ मध्ये झाले असून, २०२५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यातील १० प्रकल्पांचे काम सुरू झाले होते.
कृषी महाविद्यालयातील बोटॅनिकल गार्डनच्या ज्या जागेमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार होता, त्या जागेवर शासनाकडून जैवविविधता वारसा क्षेत्र म्हणून आरक्षण टाकण्यात आले. परिणामी, या जागेचे आरक्षण रद्द करण्यासाठी महापालिकेकडून शासनाकडे मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू असून, हे आरक्षण उठविण्यास महाविद्यालयाची मान्यता नसल्याचे कळविण्यात आल्यानंतर आता नागपूरच्या जैवविविधता मंडळानेही महापालिकेस या जागेबाबत नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने शेवटचा प्रकल्पही मार्गी लागणार आहे.
असा आहे प्रकल्प
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत असून, ११७३ कोटी रुपये जलवाहिनी व ११ शुद्धीकरण केंद्र उभारण्याचा खर्च, १५ वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी ३००.२१ कोटी रुपये खर्च असणार आहे. याअंतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या ३५० एमएलडी सांडण्यावर प्रक्रिया करून हे पाणी नदीत सोडले जाणार आहे.
हे अकरा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिका शहरात तयार होणारे ९० ते ९५ टक्के सांडपाणी शुद्ध करणार आहे. त्यासाठी नवीन ११ आणि जुने ९ असे २० प्रकल्प असणार आहेत. त्यामुळे नदीत येणारे सांडपाणी शुद्ध झाल्याने नदी पुनरुज्जीवित होणार आहे.