पवना अजूनही ‘फेसाळलेली’

केवळ जुजबी उपाययोजना; ठोस कार्यवाहीचा अभाव

पिंपरी – चिंचवड-थेरगावला जोडणाऱ्या नव्या पुलाजवळ (धनेश्‍वर मंदिराजवळ) पवना नदीपात्रात अद्याप फेसयुक्त पाणी वाहतच आहे. त्यातून दुर्गंधी येत आहे. महापालिकेकडून नदीपात्राजवळील सांडपाणी नलिका (चेंबर) दुरूस्तीची जुजबी उपाययोजना करण्यात येत आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. प्रक्रिया न करता पवना नदीपात्रात नाल्यांद्वारे थेट मिसळणाऱ्या पाण्याबाबत महापालिका प्रशासनाने ठोस कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. पवना नदीत मासे आणि कासवाचा मृत्यू झाल्यानंतर महापौरांनी महाराष्ट्र नियंत्रण मंडळावर आगपाखड केली होती. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली. मंडळ आणि महापालिका यांच्यातील वादात पवना मात्र प्रदूषितच राहिली असल्याचे दिसून येत आहे.

चिंचवड येथे पवना नदीपात्रातून गेल्या दोन आठवड्यांपासून फेसयुक्त पाणी वाहत आहे. त्याबाबत “दै. प्रभात’ने यापूर्वी 31 डिसेंबरला सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने फुटलेले चेंबर दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले. येथील जुने चेंबर हे विटांच्या बांधकामात केलेले आहे. ते बदलून आरसीसी बांधकामातील चेंबर उभारले जात आहे. पवना नदीपात्रात केजुदेवी बंधारा येथे गेल्या वर्षभरात दोनदा मासे मृत पावण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दोनदा नोटीस बजावली परंतु काहीही सुधारणा झाली नाही.

ठोस उपाययोजना नाही
पवनेत मासे मृत होण्याची घटना यापूर्वी मे महिन्यात घडली होती. तेव्हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तर, 4 डिसेंबरला पुन्हा एकदा मासे व एक कासव मृत होण्याची घटना उघडकीस आली. तुमच्याविरूद्ध खटल्याचा प्रस्ताव का दाखल करू नये, अशा आशयाची नोटीस “एमपीसीबी’तर्फे महापालिकेला बजावण्यात आली होती. याबाबत काय कार्यवाही करणार, याचा कृती आराखडा महापालिकेला सादर करण्यास सांगितले. नदीपात्रात मिसळणाऱ्या नाल्यांचे सर्वेक्षण करून योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली. मात्र, त्याबाबत अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

पवना नदीपात्रालगत फुटलेले चेंबर दुरूस्त केले जात आहे. त्याशिवाय, येथे यापूर्वी असणारे चेंबर वीट बांधकामातील होते. ते बदलुन सध्या आरसीसी बांधकामात केले जात आहे. त्यामुळे चेंबर फुटण्याचा प्रकार कमी होईल. हे सर्व काम पूर्ण होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. नदीपात्रात थेट मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यानंतर ते नदीपात्रात सोडण्याचे नियोजन आहे. पवना नदीसुधार योजनेत हा प्रस्ताव ठेवलेला आहे.
– मकरंद निकम, सह-शहर अभियंता, महापालिका.

Leave A Reply

Your email address will not be published.