मातीचा भराव टाकून पवना नदीपात्र बुजविण्याचे उद्योग सुरूच

पिंपरी – शहराची जीवनदायिनी असलेल्या पवना नदीपात्रात मातीचा भराव टाकून नदीपात्र बुजविण्याचे उद्योग सुरूच आहेत. त्यामुळे नदीपात्र अरूंद होत आहे. नदीपात्र बुजविण्याचा प्रकार सुरूच राहिल्यास पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. जमीन मालकांकडून जमिनीचे क्षेत्र वाढवून घेण्यासाठी हे उद्योग सुरू आहेत. काही ठिकाणी भराव टाकून झोपड्या आणि अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. महापालिका प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे.

पिंपळेगुरव स्मशानभूमी ते जुनी सांगवी स्मशानभूमी या सुमारे 4 किलोमीटरच्या पट्टयातील पवना नदीपात्राची पाहणी केली असता धक्‍कादायक बाबी समोर आल्या. पिंपळेगुरव स्मशानभूमीजवळ लक्ष्मीनगर येथे नदीपात्रात भराव टाकलेला आहे. त्यामुळे नदीपात्रात अरूंद झाले आहे. येथील नागरिक देखील ही बाब मान्य करतात. दापोडी स्मशानभूमीच्या येथे गेल्यानंतर उजव्या बाजूला नदीपात्राच्या मध्यभागापर्यंत भराव टाकल्याचे निदर्शनास येते. दापोडी येथील बॉम्बे कॉलनीतून घाटावर आल्यानंतर नदीपात्रालगत भराव टाकला जात आहे.

नदीच्या पलीकडील बाजूस असलेल्या पिंपळे गुरवच्या बाजूने मोठ्या प्रमाणात भराव टाकल्याने नदीपात्र अरूंद झाले आहे. नवी सांगवी येथे पवना नदीपात्राच्या बाजूने देखील मोठ्या प्रमाणात भराव टाकला आहे. तेथे नदीपात्राशेजारी झोपड्या थाटल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. पवना नदीपात्र बुजविण्याचे उद्योगामुळे नदीपात्राशेजारी असलेल्या सांडपाणी वाहिन्या बंद झाल्याने रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व प्रकाराकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

पवना नदीपात्रालगत मातीचा भराव टाकण्याचे काम खासगी जागामालकांकडून होत आहे. त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत बांधकाम परवानगी आणि अतिक्रमण विभागाला सांगितले आहे.

– संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, महापालिका 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.