केंदूर – पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत ही गेल्या सहा महिन्यांपासून धूळखात पडलेली आहे. याबाबत दैनिक प्रभातमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या वृत्ताची दखल घेत उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी या आरोग्य केंद्राची पाहणी करून येत्या दोन दिवसांत दीडशे बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी हालचाल सुरू केल्या आहेत.
शिरूर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, पाबळ येथील सुसज्ज आरोग्य केंद्राची इमारत धूळ खात पडलेली असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे स्पष्ट दुर्लक्ष झाले असल्याचे सविस्तर वृत्त दैनिक प्रभातमध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांनी ही बाब गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला तात्काळ पाबळ येथील आरोग्य केंद्राची पाहणी करून कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्याच पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पाबळ आरोग्य केंद्रात धाव घेत स्थानिक जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, विश्वास कोहोकडे, मानसिंग पाचुंदकर, सरपंच मारुती शेळके, सोपान जाधव, अरुण चौधरी, संजय नऱ्हे यांनी या आरोग्य केंद्राची पाहणी केली. येत्या दोन दिवसांत या इमारतीत दीडशे बेडच कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी देशमुख यांनी दिली.