बेंगळुरू – प्रो-कबड्डी लीगमध्ये आज (शुक्रवार) पाटणा पारेट्स व दबंग दिल्ली यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे. यंदाच्या मोसमात दिल्ली संघाचे सातत्य पाहता त्यांचेच पारडे या सामन्यात जड राहणार आहे.
उपांत्य फेरीत पाटणा संघाने युपी योद्धा संघाचा पराभव केला होता व सनसनाटी निकाल नोंदवला होता. युपीचा डुबकी किंग प्रदीप नरवाल याचे वर्चस्व मोडून काढताना पाटणा संघाने दिमाखात सामना जिंकत अंतिम फेरी गाठली होती. दुसरीकडे बलाढ्य मानल्या जात असलेल्या बेंगळुरू बुल्सवर दबंग दिल्लीने अटीतटीच्या सामन्यात मात केली. आता पाटणा व दिल्ली यांच्यात विजेतेपदासाठीची चुरस रंगणार आहे. निरज नरवाल व कृष्णा धुल या खेळाडूंवर दिल्लीची मदार असून त्यांना रोखण्यासाठी पाटणा संघाच्या खेळाडूंना सुपर रेडमध्ये जास्त लक्ष ठेवावे लागणार आहे.
टॅकलबाबतीतही दिल्ली पाटणा संघापेक्षा सरस दिसत आहे. अर्थात पाटणा संघानेही संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे हा सामना दिल्लीसाठीही सोपा नसेल. पाटणा संघाने ज्या पद्धतीने युपीच्या नरवालला दडपणाखाली ठेवले ते पाहता रेडर्स व बचावपटूंचे दिल्लीवरही वर्चस्व दिसू शकते.
समोरच्या संघाला ऑलआऊट करण्याची सरासरी दिल्लीपेक्षा पाटणा संघाने जास्त सरस असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे दिल्लीला हा सामना व विजेतेपद मिळवायचे असेल तर त्यांना पाटणा संघाच्या रेडर्सला रोखावे लागेल. या स्पर्धेच्या इतिहासात पाटणा संघाने चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली असल्याने दिल्लीचे पारडे जरी जड राहणार असले तरीही पाटणा संघ आश्चर्याचा धक्का देऊ शकतो.