पुणे – पुणे पोलिसांत बदल्यांचा विषय नेहमीच चर्चेचा असतो. यातच मागील काही दिवस बदल्यांसाठी सुरु असलेली रस्सीखेस आणि त्यानंतर झालेल्या बदल्या सध्या चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर एका भामट्याने ” पोलीस निरीक्षक पाटील बोलत आहे, तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्या कर्मचाऱ्यांची बदली करायची आहे का? ‘ असे फोन गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करण्याचा सपाटाच लावला होता. तो ठराविक जागेवरील पोस्टींगसाठी ठरावीक रकमेची मागणीही करत होता. यामुळे पोलीस दलातील वातावरण ढवळून निघाले होते. या बनावट पोलीस अधिकाऱ्यावर अखेर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेचे ड्युटी ऑफीसर रुस्तुम इसाक मुजावर (रा.गोखलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार अमित जगन्नाथ कांबळे (35,रा.फिरस्ता) याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे शाखेतील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मागील काही दिवसांपासून कांबळे हा पोलीस निरीक्षक पाटील असल्याचे भासवून फोन करत होता. समोरील कर्मचाऱ्याला तो तुमची किंवा तुमच्या ओळखीतच्या कोणाची बदली करायची आहे का? असे सांगत ठराविक पोस्टींगसाठी ऑफरही करत होता. अनेक कर्मचाऱ्यांना असे फोन आल्याने त्याची चर्चा गुन्हे शाखेत सुरु झाली होती.
सरतेशेवटी कांबळे याने मुजावर यांनाही फोन केला. यानंतर गुन्हे शाखेतील काही कर्मचारी पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले. त्यांच्या कानावर हा प्रकार सांगितला. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करुन पैशाची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
– आरोपीच्या दोन्ही किडण्या फेल
आरोपी अमित कांबळे याच्या दोन्ही किडण्या फेल आहेत. तो सध्या ससूनमध्ये उपचार घेत आहे. दोही किडण्या फेल असल्याने त्याला काही कामधंदा करता येत नाही. तो डायलिसीस झाल्यावर पदपथावर येऊन रहातो. त्याने यापुर्वीही पैसे मिळवण्यासाठी असे प्रकार केले आहेत. त्याला अटक केली तर पोलिसांनाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्याला डायलिसिससाठी दाखल करणे, औषध उपचार करणे आणि खाणे पिणे बघणे यातच पोलिसांचा वेळ जातो. यामुळे अनेकदा त्याला समज देऊन सोडण्यात आले आहे. सध्या तो ससूनमध्ये डायलिसीस घेत आहे. यामुळे त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.