पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे अतिशय सामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे त्यांनी रिक्षाचालकांना नेहमीच साथ दिली आहे. त्यांचा नम्रपणाच समोरच्याला पराभूत करेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केले.
दैनंदिन जीवनात रिक्षाचालक बांधवांच्या सेवेचे महत्त्व फार मोठे आहे. त्यांच्या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे शहरातील आणि कोथरूड मतदारसंघातील रिक्षाचालक संघटनांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी चंद्रकांत पाटील, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पिंपरी-चिंचवडचे सदाशिव खाडे, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, भाजपा कोथरूड सरचिटणीस गिरीश भेलके, रिक्षाचालक संघटनेचे केशव क्षीरसागर, सुनील मालुसरे यांच्यासह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी रिक्षाचालकांना येणाऱ्या समस्यांबाबत आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा झाली. महायुती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या मदतीची माहिती पाटील यांनी दिली. मानकर म्हणाले, की सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
पाटील यांच्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली. पाटील यांनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींसाठी काम केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, की महायुती सरकारने रिक्षाचालकांसाठी महामंडळ निर्माण केले आहे. त्याचा रिक्षाचालकांना लाभ होईल. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जास्तीत जास्त मतदान करून विजयी करावे.