पिंपरी: (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्तांच्या अधिकारात कायद्याची मोडतोड करून अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार डिप्लोमाधारक व्यक्तीकडे देण्यात आल्यानंतर पुन्हा नव्या अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. अुायक्तांनी दोनच दिवसांपूर्वी तीन अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे वाटप केले असून, महापालिकेतील सर्व “क्रिम’ विभाग संतोष पाटील यांच्याकडे तर कमी महत्त्वाचे आणि महसूल जमा करण्याचे विभाग अजित पवारांकडे दिले आहेत. त्यातच बिगर महत्त्वाच्या विभागांवर तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तांची बोळवण केल्यामुळे अंतर्गत नाराजी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य शासनाने 30 ऑगस्ट 2019 रोजी मंजुरी दिली आहे. ही मंजुरी काही अटी व शर्तींसह देण्यात आली आहे. या अटींमध्ये क्रमांक सहाच्या अटीमध्ये प्रशासकीय सेवेतील व्यक्तीला तांत्रिक विभागात आणि तांत्रिक विभागातील अधिकाऱ्याला प्रशासकीय सेवेतील पदांवर नियुक्त करता येणार नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यानंतरही विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचे कामकाज सोपविण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. सध्या तीन अतिरिक्त आयुक्त कार्यरत झाल्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या अधिकारात अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाची व जबाबदारीची फेररचना केली आहे.
ही फेररचना करताना 15 विभाग संतोष पाटील यांच्याकडे 11 विभाग अजित पवार यांच्याकडे सात विभाग प्रवीण तुपे यांच्याकडे सोपविले आहेत. या विभागाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. कामकाजाचे वाटप करताना मात्र संतोष पाटील यांच्यावर मर्जी दाखवित झुकते माप देतानाच “क्रिम’ विभाग त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. यावर्षी वैद्यकीय विभागाचीच मोठी खरेदी होणार असल्यामुळे वायसीएम आणि वैद्यकीय हे दोन्ही विभाग संतोष पाटील यांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भांडार विभाग अजित पवारांकडे देताना खरेदीचा विषय मात्र संतोष पाटील यांना बहाल करण्यात आला आहे.
याशिवाय स्थापत्य मुख्यालय, स्थापत्य उद्यान, शिक्षण मंडळ (प्राथमिक आणि माध्यमिक), विद्युत मुख्यालय, झोनिपु, उद्यान व वृक्षसंवर्धन, स्थापत्य प्रकल्प, बीआरटीएस तसेच नागरवस्ती विकास योजना हे विभाग संतोष पाटील यांना देण्यात आले आहेत. वरील विभागाचे किमान 70 ते 80 टक्के बजेट आहे. याच विभागामार्फत मोठी कामे अथवा खरेदी केली जाते. अजित पवार यांना महसूल वाढविण्यासाठी करसंकलन, आकाशचिन्ह, स्थानिक संस्था कर, अतिक्रमण मुख्य कार्यालय, सभाशाखा, भूमी आणि जिंदगी क्षेत्रीय कार्यालये हे विभाग सोपविण्यात आले आहेत. महसूल वाढीचे विभाग सोडल्यास इतर विभाग कमी महत्त्वाचे समजले जातात.
तर प्रवीण तुपे यांच्याकडे आयटीआय, कार्यशाळा, अभिलेखा कक्ष, कामगार कल्याण, सुरक्षा, क्रीडा आणि माहिती व जनसंपर्क हे विभाग सोपविण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून संतोष पाटील यांच्याकडे क्रिम विभागाची जबाबदारी आहे. आता पुनर्ररचना केल्यानंतर तरी यामध्ये बदल होईल असे अपेक्षित असतानाही आयुक्तांची मर्जी संतोष पाटील यांच्यावरच असल्याचे स्पष्ट झाले. विभाग रचनेत झालेल्या या प्रकाराची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार सिनिअर
महापालिकेत सध्या कार्यरत असलेले अतिरिक्त आयुक्त अजित पवार हे संतोष पाटील यांना सिनिअर आहेत. त्यांचे आयएएसचे प्रमोशन पाच ते सहा महिन्यांत होणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याला कमी आणि प्रशासकीय अनुभवाने कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याला अधिक जबाबदारी का दिली गेली याबाबतही चर्चा रंगली आहे.
सर्वस्वी आयुक्तांचे अधिकार
महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कोणाकडे कोणते काम अथवा जबाबदारी सोपवावी, याचे सर्वस्वी अधिकार हे महापालिका आयुक्तांना प्राप्त होतात. त्यांच्या अधिकाराचा वापर करून ते जबाबदारी निश्चित करू शकतात. मात्र अनुभवाला प्राधान्य दिले जाते हा आजपर्यंतचा अनुभव होता तो मात्र या कामकाज वाटपात मोडीत निघाला, हे मात्र निश्चित.