इंदापुरातून ‘पाटील, भरणे, माने’ भाजपमध्ये येण्यास इच्छुक

चंद्रकांत पाटील : नारायण राणेंचा विषय ताकदीबाहेरचा असल्याचा भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

पुणे – “भाजप- शिवसेनेबाबत जनतेत मोठ्या प्रमाणात विश्‍वास निर्माण झाला आहे. मागील पाच वर्षांत प्रत्येक विषयाबाबत समोपचाराने मार्ग काढला आहे. विकास व्हायचा असेल तर सरकारबरोबर यायला पाहिजे, अशी अनेक इच्छुकांची भावना झाली आहे. याच भावनेतून इंदापूर तालुक्‍यातून पाटील, भरणे आणि माने या तीन आडनावाच्या व्यक्ती भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत,’ असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान, तीन व्यक्ती भाजपमध्ये कधी प्रवेश करणार, हे मात्र पाटील यांनी स्पष्ट केले नाही.

विधानभवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी पाटील यांनी सांगितले, भाजपमध्ये येत्या दि.1 रोजी अनेक नेत्यांचा प्रवेश होणार आहे. त्यानंतरही प्रवेश सुरुच राहणार आहेत. मात्र, पक्षात प्रवेश देताना संबंधितांवर कोणतेही गुन्हे नाहीत अथवा कोणताही घोटाळा केला नाही, याची खात्री करुनच प्रवेश दिला जाणार आहे. तर, माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारले असता पाटील म्हणाले की, “हा विषय माझ्या ताकदीच्या पलिकडचा आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेण्यास समर्थ आहेत. राणे यांच्या निर्णयामुळे भाजपा आणि शिवसेनेला फायदाच होणार आहे.’ दरम्यान भाजपा आणि शिवसेनेची युती होणार असून ती होण्यास कोणतीच अडचण नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.

…तर उदयनराजेंचे स्वागतच
खासदार उदयनराजे हे राजे असून त्यांची जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल, तर ती देखील पूर्ण केली जाईल. तसेच उदयनराजे पक्षात येणार असतील तर त्यांचे पक्षात स्वागतच असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

मंदीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न
देशात निर्माण झालेली आर्थिक मंदीची स्थिती ही जागतिक मंदी आहे. मंदी ही सरकारमुळे आलेली नाही. याबाबत सुशिक्षित जनता समजून घेईल. मंदीतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून रिझर्व्ह बॅंकेकडील निधी घेतल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.