रुग्णांना शिरूरला उपचाराची परवानगी मिळावी

पारनेर  -सीमेलगत असणाऱ्या पारनेर व श्रीगोंदा तालुक्‍यांतील गावांमधील रुग्णांना शिरूर (जि. पुणे) येथे वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिरूर शाखेच्या वतीने पुणे व नगरच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. तसेच शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार नीलेश लंके यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी केली आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातंर्गत प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शिरूरपासून अवघ्या पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील पारनेर व श्रीगोंदा तालुक्‍यांतील रुग्णांना आपल्या नेहमीच्या शिरूर येथील डॉक्‍टरांकडे उपचारासाठी जाणे अशक्‍य झाले आहे. पारनेर तालुक्‍यातील निघोज, जवळे, राळेगण थेरपाळ, गुणोरे, गाडीलगाव, म्हसे, कुरुंद, वाडेगव्हाण, मावळेवाडी, श्रीगोंदा तालुक्‍यातील गव्हाणवाडी, देवदैठण, हिंगणी, राजापूर, बेलवंडी आदी गावांतील ग्रामस्थ दैनंदिन व्यवहारासाठी शिरूर येथे जातात. वैद्यकीय उपचारासाठी या गावांतील रुग्ण शिरूर येथे जातात. करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाबंदी लागू असल्याने गंभीर आजार असलेल्या रुग्णांची कुचंबणा होत आहे. त्यांना नियमित तपासणी, उपचारासाठी शिरूरमध्ये जाण्याची परवानगी द्यावी.

वैद्यकीय सेवेचे कारण देत इतर कोणीही शिरूरमध्ये येऊ नये, यासाठी डॉक्‍टरांकडून खबरदारी घेतली जाईल. रुग्णाने डॉक्‍टरांची वेळ घेतली असल्याचा संदेश संबंधित रुग्णाच्या मोबाईलवर पाठवण्यात येईल. या संदेशांच्या आधारे रुग्णाला शिरूरमध्ये प्रवेश देण्यात यावा. डॉक्‍टरांकडून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या तपशीलवार नोंदीही ठेवण्यात येतील. करोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णास तातडीने सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले जाईल, अशी ग्वाही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिरूर शाखेचे अध्यक्ष डॉ. आनंद क्षीरसागर व पारनेर फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी दिली आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
पारनेर व श्रीगोंदा तालुक्‍यांतील रुग्णांना शिरूरमधे उपचारासाठी येऊ द्यावे, यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे व नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र नगरचे जिल्हाधिकारी मात्र यासाठी अनुकूल नाहीत. त्यामुळे आता नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्फत यातून मार्ग काढण्यात येईल, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी कळविल्याचे सचिन भालेकर यांना सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.