पुणे – “ब्रिटन रिटर्न’ नागरिकांचा “जिनोमिक सिक्वेन्सिंग’ अहवाल मिळण्याला विलंब होत असून, रुग्ण पॉझिटिव्ह असेल तरच आम्ही कळवणार, असे तोंडी उत्तर “एनआयए’ने दिले आहे.
ब्रिटनहून परतलेल्या नागरिकांमधील जे करोनाने बाधित आहेत त्यांची “जिनोमिक सिक्वेन्सिंग’ टेस्ट करणे बंधनकारक केले होते. त्यानुसार गोखलेनगरमध्ये राहणारा जो पहिला नागरिक करोना पॉझिटिव्ह निघाला होता, त्याची टेस्ट करण्यासाठी 26 डिसेंबर रोजी सॅंपल देण्यात आले होते. त्याचा अहवाल 4 जानेवारीला आला. मात्र 29, 30, 31 आणि 7 या तारखांना ज्या “ब्रिटर्न रिटर्न’ करोना पॉझिटिव्ह रुग्णांची टेस्ट केली होती, त्यांचे अहवाल मात्र “एनआयव्ही’कडून बुधवारपर्यंत महापालिकेला मिळालेच नाहीत.
सॅंपल देऊन 13 दिवस उलटूनही अखेर चार जणांचे अहवाल न आल्याने महापालिकेने “एनआयव्ही’कडे विचारणा केली असता, या चार जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे उत्तर “एनआयव्ही’कडून देण्यात आले. एवढेच नव्हे तर निगेटिव्ह आला तर आम्ही सांगणार नाही, असेही त्यांनी महापालिकेला सांगितले.
सध्या “ब्रिटन स्ट्रेन’विषयीची धास्ती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. असे असताना करोनाच्या अहवालाप्रमाणेच पॉझिटिव्ह असेल तरच कळवायचे हा निर्णय “जिनोमिक सिक्वेन्सिंग’बाबतही “एनआयव्ही’ने घेतला आहे. परंतु याबाबत गांभीर्याने अहवाल कळवला जात नसल्याचे दिसून आले आहे.
तघांचे अहवाल “वेटिंग’
सद्य:स्थितीत ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत असे बुधवारी समजले; ते घरी गेले आहेत. आणखी तिघांना डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात विलगीकरणात ठेवले आहे. त्या तिघांचे “जिनोमिक सिक्वेन्सिंग’ अहवाल “वेटिंग’ आहेत. त्यांच्यातूनही कोणी पॉझिटिव्ह असेल तरच महापालिकेला कळवले जाणार आहे.