नारायणगाव- नारायणगाव व वारूळवाडी परिसरात पोलीस, नारायणगाव, वारूळवाडी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांच्या वतीने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृतीसाठी रुट मार्च काढण्यात आला. नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नारायणगाव, वारूळवाडी गावामध्ये नारायणगाव पोलीस व प्रशासनाने करोनाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी रूट मार्चमध्ये पीए सिस्टीमवर सूचना दिल्या.
रूट मार्चमध्ये नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, 20 कर्मचारी, 15 होमगार्ड, 2 वाहने, वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वर्षा गुंजाळ, कर्मचारी, एक रुग्णवाहिका,ग्रामपंचायतचे कर्मचारी असे एकूण 70 जवान, 55 मोटारसायकल, 2 पोलीस स्टेशन वाहने, 2 ग्रामपंचायतची वाहने, 5 रुग्णवाहिका सहभागी झाले होते. हा रूट मार्च नारायणगाव -आनंदवाडी- कॉलेजरोड- वारुळवाडी- अभंग वस्ती- नारायणगाव- पाटे खैरेमळा- नारायणवाडी- नारायणगाव स्टॅन्ड असा काढण्यात आला. नारंगवाडी परिसरात पोलीस प्रशासन ग्रामीण, नारायणगाव ग्रामपंचायत आरोग्य विभागाने नियोजन केले होते.