पठ्ठयाची हौसच न्यारी…! दुग्धव्यवसायासाठी शेतकऱ्याने खरेदी केले चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर

मुंबई – हौसेला मोल नसते… हे वाक्य तंतोतंत भिवंडी तालुक्यातील वडपे येथील शेतकरी असलेल्या उद्योजकाला जुळून आले आहे. जनार्दन भोईर यांनी शेतीकामाशी जोडधंदा असलेल्या दुग्धव्यवसायासाठी चक्क हेलिकॉप्टरच खरेदी केले आहे. त्यांच्या या हेलिकॉप्टर खरेदीची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.

पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरातसारख्या देशभरात वेगवेगळ्या भागात दूधविक्री करण्यास जावे लागते. या राज्यांमधील अनेक भागात विमानतळाची सुविधा नाही. यामुळे मोठा प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर त्यांच्या एका मित्राने हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा सल्ला दिला. यामुळे आपल्या प्रवासाला सुलभ बनवण्यासाठी ३० कोटीचे हेलिकॉप्टर खरेदी केली आहे, असे जनार्दन यांनी सांगितले. 

त्यापूर्वी जागेवरील व्यवस्थेची चाचपणी करण्यासाठी मुंबईतून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वरपे गावात आले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये जनार्दन भोईर यांनी स्वतः न बसता गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांना फेरफटका मारून आणले.

जनार्दन यांनी २.५ एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, १५ मार्च रोजी हेलिकॉप्टरची डिलिव्हरी होणार आहे.

कोण आहेत जनार्दन भोईर?

जनार्दन यांच्याकडे १०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता आहे. शेती आणि दुग्धव्यवसायाशिवाय जनार्दन यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीत गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.