पाथर्डीत ट्रॅक्‍टरच्या शोरूमला भीषण आग

पाथर्डी – शहरातील पूजा ऑटोमोबाईल या महिंद्रा ट्रॅक्‍टरच्या शोरूमला आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला तरी आगीचे नेमके कारण समजू शकले नसले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी नगर राष्ट्रीय महामार्गावर माळी, बाभुळगाव हद्दीत भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या पूजा ऑटोमोबाईल हे ट्रॅक्‍टरचे शोरूम आहे. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या शोरूमच्या मागील बाजूला असलेल्या गोडाऊनमधून धूर निघत असल्याचे या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ आरडाओरड करत परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावून घेतले. घटनेची माहिती शोरूमचे मालक माणिक खेडकर यांना दिली. खेडकर यांनी तातडीने वृद्धेश्वर कारखाना व नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला बोलावले मात्र अग्निशामक दलाच्या गाड्या येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शोरूममध्ये ऑइल असल्याने आग मोठ्या प्रमाणात इतरत्र पसरली. शोरूमच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी रॅकचे गज सुद्धा लागलेल्या आगीने वितळले होते. खेडकर यांनी पुढील बाजूचे शटर उघडून कार्यालयात असलेले फर्निचर नागरिकांच्या मदतीने बाहेर काढल्याने शोरूमच्या पुढील बाजूस आग पसरली नाही.

अग्निशामक दलाच्या गाड्या आल्यानंतर दोन तासात आग आटोक्‍यात आली. या घटनेत नेमकी किती रुपयांची वित्तीय हानी झाली हे समजू शकले नसले तरीही जवळपास 60 ते 65 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती खेडकर यांनी दिली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नसले तरीही शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. परिसरातील नागरिकांनी शोरूममध्ये व परिसरात असलेले अनेक नवीन व जुने ट्रॅक्‍टर तात्काळ बाहेर काढून घटनास्थळापासून लांब उभे केले. त्यामुळे मोठी वित्तहानी टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)