कळस पिंप्रीतील मारामारीत एकाचा मृत्यू

गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्यावरून वाद : दोन्ही गटातील 11 जण जखमी

पाथर्डी – गायरान जमिनीवर असलेल्या अतिक्रमणाच्या मुद्यावरून दोन गटात मंगळवारी झालेल्या मारामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला, तर अकरा जण जखमी होण्याची घटना तालुक्‍यातील कळसपिंप्री येथे घडली. या संदर्भात आज सायंकाळपर्यंत पोलीस स्टेशनला कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिक्रमणाच्या प्रश्‍नात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर ही घटना टाळता आली असती. या घटनेत कंस लक्ष्मण पवार (वय 65) हे मयत झाले आहेत. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, कळसपिंप्री गावालगत वनविभागाची जमीन असून गेल्या दहा वर्षांपासून या जमिनीवर आदिवासी भिल्ल समाजाचे लोक राहत आहेत. याच जमिनीत ते पेरणीसुद्धा करून पिके घेत होती. सध्या या जमिनीवर जलयुक्‍त शिवाराचे काम चालू आहे. या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे ते सध्या बंद ठेवावे लागले आहे.

या ठिकाणचा अतिक्रमणाचा प्रश्‍न सोडवा यासाठी तेथील काही ग्रामस्थांनी आठ दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात येऊन निवेदन सुद्धा दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्याने दोन्ही गटातील वाद चिघळला. त्यामुळे मंगळवारी दुपारी दोन्ही गटात जोरदार हाणामारी होऊन त्यामध्ये महिनाबाई विठ्ठल बर्डे, शोभा शिवाजी बर्डे, बाळू अर्जुन गायकवाड, कंस लक्ष्मण पवार, बद्रीनाथ भगवान येडे, संदीप रावसाहेब मिसाळ, विशवनाथ नारायण बुळे हे जबर जखमी झाले होते. या सर्वांना रात्री पाथर्डी येथील उप जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नगरला हलवण्यात आले.

संदीप शिवाजी मिसाळ, भगवान सीताराम सोनावणे, कमलाकर गणपत गाडे, दादासाहेब बन्सी झिरपे, ज्ञानेश्‍वर गोवर्धन मिसाळ याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. या घटनेत गंभीर जखमी झालेले कंस पवार यांचा नगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे दोन्ही हात व एक पाय फ्रॅक्‍चर झाला होता. या घटनेने कळसापिंप्री येथे सध्या तणाव निर्माण झाला आहे. आज सायंकाळी हा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी नगर येथे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी रवाना झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)