खड्डे बुजवा : महापौरांचे अधिकाऱ्यांना पुन्हा आदेश

पुणे – रस्त्यांवरील खड्डे 10 दिवसांत बुजवा, असे पुन्हा एकदा आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना खास बैठक घेऊन दिले आहेत. नुकत्याच झालेल्या मुख्यसभेतही महापौरांनी हे आदेश दिले होते.

15 जुलै रोजी झालेल्या मुख्यसभेत सदस्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात प्रश्‍न उपस्थित केले होते. येत्या 10 दिवसांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी महापौरांनी बैठक घेतली.

महापालिकेच्या येरवडा येथील बॅचमिक्‍स प्लॅंन्ट 3 शिफ्टमध्ये चालू ठेवण्यात येणार आहे. कॅटनिक इमल्शन, कोल्ड मिक्‍स मटेरियल आणि 100 एम. एम. पेव्हिंग ब्लॉक यांच्या माध्यमातून जागेवर परिस्थिती प्रमाणे खड्डे बुजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंगळवारपासून जागेवर मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. तसेच नागरिकांनी संबंधित अभियंत्यांना व्हॉटस ऍपवर खड्ड्यांचे लोकेशन्स पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.खात्याकडे उपलब्ध असलेल्या रोड मेन्टेनन्स व्हॅनचा पूर्ण क्षमतेने वापर करून कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांच्या देखरेखीखाली ही सर्व कामे करून घेण्यात येत आहेत. तसेच पावसाळ्याचा कालावधी संपेपर्यंत खड्डे बुजवलेल्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्यास त्यावर त्वरेने उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे आश्‍वासन पथ विभागाने या बैठकीत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)