पाथर्डी – भाचीला प्रियकरासोबत पळून जाण्यास मदत केल्याचा संशय आल्याने साकेगाव येथील हनुमान नगर तांड्यावरील अठरा वर्ष वयाच्या तरुणीला लोखंडी पाईप व रॉडने मारहाण करून जीवे ठार मारल्याची घटना घडली. गीता रमेश राठोड असे मयत मुलीचे नाव आहे. सोमवार दि.29 मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या नंतर ही घटना घडली. याबाबत मयत मुलीची आईने पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
मयत मुलीचे आई-वडिल परिवारासह साकेगाव येथील हनुमान नगर तांड्यावर राहतात. मयत मुलीचे वडील रमेश राठोड आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे कोळशाच्या कामानिमित्त बाहेरगावी असतात. याच तांड्यावर त्यांच्या शेजारी स्वप्निल धोंडीराम राठोड हा परिवारासमवेत राहतो. दोन महिन्यांपासून स्वप्निल राठोड यांची भाची रहावयास आलेली होती.
मयत गीता व राठोड यांची भाची यांची ओळख होऊन बोलणे सुरू होते. भाचीला प्रियकरासोबत पळून जाण्यास गीता मदत करत असल्याची शंका स्वप्नील राठोड यांना होती. दि.29 मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याची सुमारास स्वप्निल राठोड, मनीषा सुरेश चव्हाण (दोन्ही रा. हनुमान नगर तांडा, साकेगाव) उषा बबन पवार (रा.खांडके, जि. नगर) असे मयत गीताच्या घरी आले.
गीताशी काही बोलायचे आहे. तिला बाहेर पाठवा, तिच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे गीताच्या आईला म्हणाले. मयत गीताला मोटरसायकलवर घेऊन गेले. गीता लवकर घरी न आल्याने भाऊ रोहन तिला पाहण्यासाठी गेला. डांगेवाडी येथे स्वप्निल राठोड यांचे नातेवाईक हरीश प्रभाकर पवार यांच्या घरी मयत गीतास मारहाण सुरू होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून आई सविता व इतर नातेवाईक शोध घेऊ लागले. तांड्याच्या परिसरातील विहिरीत मयत गीताचा मृतदेह आढळून आला. आईच्या फिर्यादीवरून स्वप्निल धोंडिराम राठोड, मनिषा सुरेश चव्हाण (रा. हनुमाननगर तांडा, साकेगाव ता. पाथर्डी), उषा बबन पवार (रा खांडके ता. जि. नगर), हरेश प्रभाकर पवार (रा.डांगेवाडी ता. पाथर्डी), किरण रामसिंग राठोड, अजय शंकर जाधव, नीलेश रमेश राठोड (रा. खांडके) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे तपास करत आहेत.