मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीनंतर अखेर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता शाहरुख खान याने 4 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे.
25 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले असून, चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारल्याचं दिसून आलं आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. साहव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईला बॉक्स ऑफिसवर ब्रेक लागला आहे.
सातव्या दिवशी चित्रपटाने फक्त 23 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. तर, आठव्या दिवशी चित्रपटाने जवळपास 18.25 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आणि नवव्या दिवशी चित्रपटाने फक्त 15.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, पठाण चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर कमाईचा आकडा कमी होत असला तरी, आता पर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडल्याचं दिसून आलं आहे.