खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी; अपघाताची शक्यता वाढली
पिंपळे गुरव – पिंपळे गुरव आणि परिसरातील रस्त्यांची पावसामुळे पुरती वाटली लागली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराजा हॉटेल या परिसरातील एक मार्ग सांगवीकडे जातो तर दुसरा पिंपळे गुरव व एक दापोडीकडे. या मार्गावरील रस्ते पावसामुळे अतिशय खराब झालेले आहेत. रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालकाला त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच भर म्हणून कित्येक दिवसांपासून या ठिकाणी ड्रेनेजचे तर कुठे पाईपलाईनचे काम सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर खोदाई केलेली आहे. अशीच परिस्थिती पिंपळे गुरवमधील रामकृष्ण कार्यायालय चौक परिसरातील आहे. येथे अनेक दिवसांपासून रस्ते खोदलेले आहेत.
वाहन चालकाने वाहने तरी कशी चालवायची? असा प्रश्न पडतो. या खड्ड्यांत पाणी साचले असल्यामुळे चालकाला अदांज येत नाही. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच शाळकरी मुले आणि नागरिकांना आपला जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे. रामकृष्ण मंगल कार्यालय परिसरात रस्त्याची कामे सुरू आहेत. यामुळे दापोडी, पिंपळे गुरवकडे जाणाऱ्या रस्त्यावर काम सुरु आहे. रस्त्याचे काम सुरु असताना जेसीपीची बसला धडक लागली. असे अनेक छोटे मोठे घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांमधून होत आहे.