हागणदारीमुक्‍त गाव योजना माण तालुक्‍यात कागदावरच

बिदाल – माण तालुक्‍याच्या ग्रामीण भागात रस्त्याच्या दुतर्फा उघड्यावर बसून प्रातर्विधी उरकणारे अनेक चेहरे नजरेस पडतात. त्यामुळे शासनाच्या हागणदारीमुक्‍त गाव या योजनेवर पाणी फिरवले जात आहे. केंद्र शासनाच्या निर्मल भारत योजनेतून शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळत असल्याने अनेकांनी शौचालये बांधली आहेत. मात्र, माण तालुक्‍यातील बऱ्याच गावांमध्ये शेकडो स्त्री-पुरुष उघड्यावर शौचास जाताना दिसत आहेत.
गावांमधील अनेक रस्ते हागणदारीने माखलेले दिसात.

शासनाने यापूर्वी गुड मॉर्निंग पथके निर्माण करून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांविरोधात तीव्र मोहीम राबवली होती. सुरुवातीला गुलाबपुष्प देऊन लाजिरवाणे स्वागत करण्यात येत होते तर त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. मात्र, आता ही पथके बरखास्त झाल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढली आहे.

आज प्रत्येक घरात दूरचित्रवाणी, मोबाईल, केबल टीव्ही आणि समाज माध्यमांचा वापर होत आहे. त्यातून जनजागृती सुरू असूनही उघड्यावर शौचास जाणे योग्य नसल्याचे अजूनही लोकांना कळलेले दिसत नाही. लहान मुले तर रस्त्यावर किंवा घराजवळच शौचाला बसतात.

म्हसवड आणि दहिवडी या शहरांमधील झोपडपट्ट्या किंवा अनधिकृत वस्त्यांमध्ये शौचालये नाहीत. तेथे सार्वजनिक शौचालये असले तरी त्यांचा पुरेसा वापर होत नाही. लोकसंख्येच्या मानाने त्यांची संख्याही अपुरी आहे. अनेक खेड्यांमध्ये घरात शौचालये नसल्याने माता-भगिनींना नाईलाजाने उघड्यावर शौचास जावे लागत आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन रोगराई पसरत आहे. त्यामुळे शौचालये न बांधणाऱ्यांवर आणि ती बांधूनही त्यांचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.