पाटण (प्रतिनिधी) – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार, दि. 11 रोजीचा पाटणचा आठवडा बाजार भरवला जाणार नाही. शहरातील दुकाने अत्त्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात वाढता करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी चालू केली आहे. लॉकडॉऊनमधून काही प्रमाणात सूट दिली असली तरी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सोमवारी पाटणचा आठवडा बाजार असतो. पाटण तालुक्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केली जाते. मात्र, जिल्ह्यातील वाढत्या करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तसेच कराड येथे आढळून येत असलेले रुग्ण यांची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी पाटण शहरात सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून सोमवारी असणारा पाटणचा आठवडा बाजार पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही दुकाने चालू राहणार नाही. याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी व प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.