सातारा – पाटण तालुक्यातील जनतेने सलग दोन निवडणुकीत मला विजयी केले. 2024 च्या निवडणुकीतही सत्यजित पाटणकरांची हौस भागवण्यास तयार असल्याचे सांगून ना.शंभूराज देसाई यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी सत्यजित पाटणकरांनी केलेल्या टीकेचा खरपुस समाचार घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर शंभूराज देसाई नियोजन भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
पाटण तालुक्यातील देसाई व पाटणकर या दोन घराण्यांचा परंपरागत राजकीय संघर्ष जिल्ह्यासह राज्याला माहित आहे. गेली अनेक दिवस शांत असलेले दोघांतील वाकयुद्ध थंडावले असतानाच ना. देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर सत्यजित पाटणकर यांनी त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका करण्यास सुरूवात केली आहे.
पाटणकरांच्या टीकेला दुर्लक्षित करताना देसाई यांनी कोण पाटणकर, असा सवाल विचारला तर आमदारकीचा राजीनामा द्या, मग मी कोण ते समजेल अशी टीका पाटणकरांनी केली होती. त्याला उत्तर देताना पाटणकरांची हौस 2024 साली भागवली जाईल, असा टोला ना. देसाई यांनी लगावल्याने हे वाकयुद्ध पुन्हा एकदा सुरू झाल्याचे दिसून आले. सत्यजित पाटणकरांच्या टीकेकडे देसाई यांचे लक्ष पत्रकारांनी वेधले असता ते म्हणाले, “ज्यांचा विधानसभेला दोन वेळा व कारखाना निवडणुकीत परावभव केला. त्यांच्याबाबत मला प्रश्न विचारू नका.’ त्यांना विधानसभेची हौस असेल तर 2024 साली त्यांनी मैदानात यावे त्यांची हौस त्यावेळी भागवू असा सणसणीत टोला ना. देसाई यांनी पाटणकरांचे नाव न घेता लगावला.