संतोष पवार
सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत पाटण तालुक्याला एक तरी सभापतिपद मिळेल, अशी अपेक्षा होती मात्र या निवडीतही पक्षश्रेष्ठींनी धक्कातंत्राचा वापर केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी दत्तक घेतलेल्या एनकूळ गावात शरद पवारांनी समाजकल्याण सभापतिपद देत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची नाराजी ओढवून घेतली.
सातारा – जावळीच्या पदरातही काहीच न पडल्याने सदस्यांमध्ये उघडपणे नसली तरी नाराजी आहे. पिंपोडे बुद्रुक गटातील मंगेश धुमाळ यांना कृषी सभापतिपद मिळाले असून धुमाळ यांच्या रुपाने कोरेगाव तालुक्यात तिसऱ्यांदा कृषि सभापतिपद मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व ठेवत राज्यात महाविकास आघाडीप्रमाणे इथे मात्र शिवसेना किंवा कॉंग्रेसला स्थान दिलेले नाही.
जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असून पहिल्या अडीच वर्षासाठी अध्यक्षपद फलटण तर उपाध्यक्षपद जावळी तालुक्याला मिळाले होते. शिक्षण सभापतिपद पाटण, कृषी सभापतिपद खंडाळा, समाजकल्याण सभापतीपद खटाव, महिला बालकल्याण सभापतिपद सातारा तालुक्याला मिळाले होते. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीने धक्कातंत्राचा वापर करत अध्यक्षपदी अपक्ष सदस्य शिरवळचे उदय कबुले यांना संधी देत आ. मकरंद पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
उपाध्यक्षपद अनपेक्षितरित्या खटावच्या प्रदीप विधाते यांना देण्यात आले. या निवडीनंतर ज्येष्ठ सदस्य मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, दीपक पवार नाराज असल्याची चर्चा होती. जिल्हा परिषद सभापती निवडीत पक्षीय समतोल राखत पक्षश्रेष्ठी न्याय देतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार मानसिंगराव जगदाळे यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान करत त्यांना शिक्षण व अर्थ समिती सभापतिपद, मंगेश धुमाळ यांना कृषी व पशुसंवर्धन, सोनाली पोळ यांना महिला व बालकल्याण सभापतिपद, कल्पना खाडे यांना समाजकल्याण सभापतिपद मिळाले.
पाटण तालुक्यात राष्ट्रवादीकडे आमदारकी नाही. याशिवाय पाटणकरांचे निकटचे प्रतिस्पर्धी असलेले शंभूराज देसाई यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने पाटणकर गटात अस्वस्थता आहे. पाटण तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला ताकद देण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सभापती निवडीत पाटणला एकही सभापतिपद न मिळाल्याने माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर नाराज आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर उमेदवारांची नावे जाहीर होण्यापूर्वीच पाटणकर यांनी अध्यक्षांचा बंगला सोडला. ना. रामराजे यांनी त्यांना दालनात बोलावूनही ते गेले नाहीत. त्यामुळे पाटणकरांना राष्ट्रवादीने का नाराज केले, याचीच चर्चा सर्वत्र सुरु होती. शरद पवार यांचे सातारा जिल्ह्यावर विशेष लक्ष असल्याने जिल्ह्यातील बारीक सारीक घडामोडींचीही ते नोंद ठेवतात.विक्रमसिंह पाटणकर आणि शरद पवार यांच्यामध्ये चांगले संबंध असताना पाटणकर यांना नाराज करुन पक्षाने समाजकल्याण सभापतिपद एनकूळच्या कल्पना खाडेंना का दिले, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
शरद पवार यांनी एनकूळ गाव दत्तक घेतले असून त्यांनी या गावात अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. याशिवाय एनकूळचे अर्जुनराव खाडे शरद पवार यांचे निकटचे म्हणून ओळखले जातात. खाडे जिल्हा बॅंकेवर संचालक असून त्यांच्या स्नुषा कल्पना खाडे निमसोड गटातून विजयी झाल्या होत्या. विशेष म्हणजे माण- खटाव मतदारसंघातील सोनाली पोळ यांना महिला व बालकल्याण सभापतिपद देण्यात आले असतानाही याच मतदारसंघातील एनकूळच्या कल्पना खाडे यांनाही सभापतिपद मिळाले.
विशेष म्हणजे एनकूळचे सरपंचपद अफसाना शकिल मुजावर या सांभाळत असून शरद पवार यांनी महिला पदाधिकाऱ्यांना नेहमीच पदे देण्यास पुढाकार घेतल्याचेच दिसत आहे. शरद पवार यांनी एकाच विधानसभा मतदारसंघात दोन सभापतिपदे देवून भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात धैर्यशील अनपट आणि मंगेश धुमाळ यांच्यापैकी कोण सभापती होणार याची उत्सुकता होती. याही निवडीत अनपेक्षितपणे मंगेश धुमाळ यांची कृषी सभापतिपदी वर्णी लागली. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडताना सातारा- जावळी, कराड दक्षिण, पाटण मतदारसंघाला डावलण्यात आल्याने काही अंशी पक्षात नाराजीचा सूर असून ही नाराजी पक्षश्रेष्ठी कशी दूर करणार, याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.
नाराज सदस्य होणार आक्रमक?
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतिपदाच्या निवडीत डावलण्यात आल्याने अनेक सदस्य नाराज आहेत. पदाधिकारी नवीन असून त्यांना सभागृहाचा जास्त अनुभव नाही. त्यामुळे नाराज सदस्यांनी एकत्र येत विद्यमान पदाधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे. नाराज सदस्य आक्रमक होणार असून आगामी काळात सभागृहात पक्षांतर्गतच कलह पाहावयास मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.