पाटण तालुक्‍यात तुरळक पावसावर खरीपपूर्व पेरणी कामांना वेग

बाजारपेठेत विविध बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

पाटण -पाटण तालुक्‍यात तुरळक पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतींना प्रारंभ केला आहे. विविध प्रकारची बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी दुकानात गर्दी केली आहे. हालक्‍या पडणाऱ्या पावसामुळे पेरणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली असून खरीप हंगामातील शेतीच्या कामांना वेग आला आहे.

तालुक्‍यात भात हे खरीपातील मुख्य पिक आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती केली जाते. यामध्ये भात, हायब्रीड, नाचणी, भुईमुग ही पिके घेतली जातात. तालुक्‍यात भातपिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात असते. लागणीच्या भात पिकासाठी तरवे पेरणी केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी शेतीची मशागत करून ठेवली आहे. तर ज्वारी, नाचणी, भुईमूग या पिकांची पेरणी शेतकरी करत आहेत. मागील दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून त्याआधारे खरीपाची पिकांची पेरणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

यावर्षी तालुक्‍यात खरीप हंगामातील पेरणीसाठी भात पिकासाठी साधारण 18451 हेक्‍टर क्षेत्र आहे. खरीप ज्वारीसाठी 9038 एवढे तर तृणधान्यासाठी 819.5 एवढे क्षेत्र आहे. भुईमुग 767 हेक्‍टर सोयाबीनसाठी 362 हेक्‍टर एवढे क्षेत्र यावर्षी आहे. सध्या बाजारपेठेत विविध प्रकारची बियाणे उपलब्ध असून कमी पाण्याच्या व लवकर काढणीस येणाऱ्या भात पिकांच्या बियाणांची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कृषी दुकानात महाबीज इंद्रायणी, आर-24, कोमल वाय एस आर अशी भातांची वाण आहेत.

हायब्रिडमध्ये हरिता 540, महाबीज 7 अशी बियाणे उपलब्ध आहेत.तालुक्‍याच्या विविध भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरणीला शेतकऱ्यांनी दमदार सुरवात केली आहे. डोंगरी भागामध्ये भाताची धुळवाफेवर पेरणी करण्यात येत असून मान्सून सक्रीय झाल्यानंतर भात लावणीसाठी तरवे टाकण्याची लगबग सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.