पाटण – शेतकऱ्यांनो थांबा…! पाटणचा कृषी विभाग “झोपलायं’

सूर्यकांत पाटणकर

पाटण  – राज्य शासन व शेतकरी यांच्यामधील दुवा असणारा पाटण तालुका कृषी विभागाचा कारभार सध्या “आवो जाओ घर तुम्हारा’ असाच झाला आहे. रिक्त पदांचा ‘शुक्‍ल काष्ट’ कायम असल्याने याठिकाणी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. रिक्त पदांचा ‘अतिरिक्त’ कार्यभार असणारे अधिकारी, कर्मचारी मोकाट असल्याने त्यांच्यावर कोणाचाही अंकुश राहिला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यालयात कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभाग ‘झोपला’असल्याची प्रचिती वारंवार येत आहे.

दुर्गम डोंगराळ असणाऱ्या पाटण तालुक्‍यात शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत कामासाठी शेतकऱ्यांना पाटण तालुका कृषी कार्यालयात जावे लागते शासनाच्या विविध योजना तसेच मार्गदर्शन घेण्यासाठी शेतकरी तालुका कृषी कार्यालयात गर्दी करतात. तर शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होताना दिसतात. मात्र रिक्त पदांच्या समस्येमुळे कार्यालयात अधिकारी-कर्मचारी दिसून येत नाहीत. तर असणारे अधिकारी-कर्मचारी ही कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर नसल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सध्या पाटण तालुका कृषी कार्यालयात सावळा गोंधळ पाहण्यास मिळत आहे.

यापूर्वी जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या पाटण तालुका कृषी विभागाने गेल्या दोन वर्षात कामकाजात सुधारणा केली नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे अविनाश मोरे यांची जिल्हा परिषदेत पदोन्नती झाली त्यानंतर गेली वर्षभर पाटण तालुका कृषी कार्यालयाला कायमस्वरूपी कृषी अधिकारी मिळाला नाही. सध्या पाटण तालुका कृषी कार्यालयाचा कारभार कराड येथील तांत्रिक कृषी अधिकारी डी. ए. खरात पाहत आहेत.
पाटण तालुक्‍यात पाटण मल्हारपेठ, ढेबेवाडी, तारळे अशी चार कृषी मंडल कार्यालय आहेत. विभागवार असणाऱ्या या कार्यालयांमध्ये मंडल कृषी अधिकारी या पदाचा “वनवा’ आहे. त्यामुळे मंजूर असणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांपैकी केवळ तारळे विभागाला कायमस्वरूपी मंडलाधिकारी आहेत. तर पाटण कृषीमंडल कार्यालयाचा कार्यभार कराड आस्थापनातील संजय दिक्षित यांच्याकडे अतिरिक्त सोपवण्यात आला आहे.

ढेबेवाडी कृषी मंडल कार्यालयाचा कार्यभार सुपरवायझर असणारे महादेव आगवणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मल्हारपेठचा कार्यभार अविनाश पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांच्या नंतर महत्त्वाचे असणारे मंडल कृषी अधिकारी पद रिक्त असल्याने तालुक्‍यातील या विभागाचा कार्यभार सध्या सुपरवायझर यांच्याकडे सोपवण्यात आला. अतिरिक्त असणाऱ्या कार्यभार यामुळे कृषी विभागाचे कामकाज सुरळीत होताना दिसत नाही. तालुक्‍यात कृषी सहाय्यक पदांचाही दुष्काळ आहे. तालुक्‍यात 48 पैकी केवळ 30 कृषी सहाय्यक आहेत. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना बांधावर जाऊन शेती संबंधी मार्गदर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारी कृषी सहायकांच्या असते.

मात्र तालुक्‍यातील मंडल कृषी कार्यालयांमध्येही कृषी सहाय्यक नसल्याने व असणाऱ्या कृषी सहाय्यकाकडे तीन ते चार गावांचा कारभार असल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना व शेती पूरक मार्गदर्शना पासून वंचित राहावे लागत आहे. काही कृषी सहाय्यक कामचुकार असल्याने घरातूनच कृषीचा आढावा वरिष्ठांना देण्याचे काम त्यांच्याकडून होताना दिसत आहे. त्यामुळे महत्त्वाचे असणारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे व शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे हे काम त्यांच्याकडून होताना दिसत नाही. दरम्यान, अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना यंदा करोनाचा फटका बसला. त्यात शासनाच्या कृषी विभागांची अशी अवस्था त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.

कृषी कार्यालयात ‘सन्नाटा’
सोमवार हा पाटण चा आठवडा बाजार असतो. त्यामुळे बाजारासाठी येणारे शेतकरी शासकीय कामानिमित्त कार्यालयात जातात असेच शेतकरी पाटण तालुका कृषी कार्यालयात सकाळी 11 वाजता गेले असता त्या ठिकाणी कोणतेही अधिकारी हजर असल्याचे दिसून आले तर मंडळ कृषी अधिकारी उपस्थित नव्हते. आस्थापनातील महत्त्वाचे पद असणारे क्‍लर्क हे ही उपस्थित नव्हते. दोन तीन कर्मचारी सोडले असता संपूर्ण कार्यालयात ‘सन्नाटा’ पसरलेला होता.

पाटण तालुका कृषी कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे कृषी विभागाचे कामकाज असमाधानकारक होत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र आज जे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उशिरा हजर झाले त्यांच्यावर लेट मार्कचे कारवाई करणार आहे. तर पाटण तालुका कृषी कार्यालयाचा कारभार सुधारण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार आहे.
दत्तात्रय खरात
प्रभारी तालुका कृषी अधिकारी, पाटण

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.