पुणे : पुनवडी ते पुणे… या गावठाणाचे शहर झाले शहराचे महानगर. पण इतिहासाच्या पाऊलखुणा या शहरात जागोजागी दिसतात. शहराच्या प्राचिनतेची साक्ष देणारे शहराच्या मध्यवर्ती भागातील एक सौंदर्यस्थळ म्हणजे पाताळेश्वर मंदिर. कोणी म्हणतं ते आठव्या शतकातील आहे. तर काहींच्या मते ते पांडवकालीन आहे. कोणताही दावा खरा मानला तरी या शहराच्या पुरातनपणाची साक्ष हे मंदिर देते हे निश्चित.
हे मंदीर म्हणजे खरे तरं एक लेणे. पुण्याला मिळालेले सौंदर्यांचे देणे… मनाला शांती देणारे इश्वरी अनुभुती देणारे ठाणे… म्हणजे पाताळेश्वर मंदिर… या मंदिराची रचना राष्ट्रकूट राजवटीच्या काळात झाली असे पुरातत्व अभ्यासकांचे म्हणणे तर पांडवांनी वनवासाच्या काळात ही लेणी निर्माण केल्याची अनेकांची श्रध्दा. ब्रिटिशांनी 26 मे 1909 ला आज्ञापत्र काढून हे मंदिर पुरातन असल्याचे जाहीर केले. त्यानुसार केंद्रीय पुरातत्व खात्याने याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली.
एका अखंड खडकात खोदकाम करून या लेण्यांची निर्मिती करण्यात आली. त्यातील कोरीव नक्षीकाम मनाला मोहून टाकते. अनेक देवता येथे गुण्यागोविंदाने एकाच छताखाली नांदतात. संत जंगली महाराज येथेच ध्यान धारणा करत असत. पुण्यातील या पुरातन मंदिराला एकदा तरी भेट द्यायलाच हवी, नाही का?