रिफ्लेक्‍टर असेल तरच वाहनांना पासिंग

पुणे – केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियमानुसार प्रवासी वाहनांना मान्यताप्राप्त “रिफ्लेक्‍टर’, “रिफ्लेक्‍टर टेप’ आणि मागील बाजूस “रियर मार्किंग प्लेट किंवा टेप’ लावणे बंधनकारक आहे. या नियमानुसार पाहणी केल्यानंतर संबंधित वाहनाची नोंदणी आणि योग्यता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे परिपत्रक राज्याचे अतिरिक्त परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी काढले आहे. या परिपत्रकानुसार तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत. मात्र, या परिपत्रकाबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे निर्णयाच्या अंमलबजावणीला मुदतवाढ देण्याची मागणी वाहतूक संघटनांकडून करण्यात येत आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियमातील तरतूदीनुसार “एआयएस 089′ आणि “एआयएस 090′ मानकांची पूर्तता करणारे “रिफ्लेक्‍टर्र’ असणे महत्त्वाचे आहे. या नियमांनुसार सर्व वाहनांची पाहणी कार्यालयांकडून करण्यात येणार आहे. त्यानंतरच वाहनाची नोंदणी करण्यात येणार असून योग्यता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या नियमांची पूर्तता न केल्यास योग्यता प्रमाणपत्र न देता संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. थेट अंमलबजावणीनंतर वाहतूकदारांना या परिपत्रकाबाबत माहिती मिळाली. त्यामुळे ऐनवेळी पासिंगसाठी आलेले वाहतूकदार कागदपत्रांची पूर्तता करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाहनांचे “पासिंग’ होऊ शकले नाही. यामुळे वाहतूकदारांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.