पिंपरी -“दैनिक प्रभात’च्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीच्या उपसंपादिका निशा पिसे यांचे गुरूवारी आकस्मिक निधन झाले. त्या 36 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर जुन्नर तालुक्यातील उंब्रज (ता. जुन्नर) या त्यांच्या मूळ गावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
निशा यांनी दै. केसरीतून पत्रकारितेला सुरूवात केली. “दै. लोकसत्ता’च्या “पिंपरी चिंचवड अंतरंग’ पुरवणीसाठी त्यांनी लेखन केले. “एमपीसी न्यूज’ मध्ये त्यांनी मुख्य वार्ताहर म्हणून काम केले. त्यानंतर “पीसीबी टुडे’च्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली.
सध्या त्या दैनिक प्रभातच्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांनी पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघाचे अध्यक्षपदही भूषवले होते. अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनामुळे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह पत्रकारिता, राजकीय, सामाजिक, कामगार क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी रविवार दि. 3 रोजी होणार आहे, तर दहाव्याचा विधी त्यांच्या मूळगावी उंब्रज येथे 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी (दि.2) दुपारी चार वाजता महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील भा. वि. कांबळे पत्रकार कक्षात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.