करोना काळानंतर सेवेची वाटचाल : आरक्षणाचा कालावधी 10 हून 120 दिवसांवर
पुणे – विशेष रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगसाठी आगाऊ आरक्षण कालावधी 10 दिवसांचा होता. मात्र, आता 10 फेब्रुवारीपासून विशेष गाड्यांचा तिकीट आरक्षणाचा कालावधी 120 दिवसांपर्यंत वाढविण्यात आला असून, विशेष गाड्यांच्या तिकिटांचे बुकिंग सुरू केले आहे.
नियमित प्रवासी गाड्या सुरू झाल्या नसल्याने, रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. यापूर्वी प्रशासनाने विशेष गाड्यांच्या तिकीट आगाऊ आरक्षणासाठी 10 दिवसांच्या कालावधीची (ऍडव्हान्स रिझर्वेशन पीरियड) घोषणा केली होती. मात्र, आता 10 फेब्रुवारीपासून काही गाड्यांसाठी हा कालावधी 120 दिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर – तिरुपती विशेष, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हुजुर साहिब नांदेड विशेष, पुणे-हजूर साहिब नांदेड विशेष, लोकमान्य टिळक टर्मिनस – सिकंदराबाद विशेष, पनवेल- हुजुर साहिब नांदेड विशेष, अमरावती-तिरुपती उत्सव विशेष या गाड्यांच्या आरक्षणाचा कालावधी वाढवला असून, 10 फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर या गाड्यांचे बुकिंग सुरू होणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.