‘पासहोल्डर’ची रेल्वे डब्यात “दादागिरी’

प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची मागणी : जागा अडवून ठेवत अन्य प्रवाशांना दमदाटी

पुणे – पुणे-मुंबई-पुणे मार्गांवर प्रवास करणाऱ्या “महिलांची दादागिरी’ पुन्हा एकदा समोर आली आहे. एक्‍स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवास करणारे “पासहोल्डर’ जागा अडवून ठेवत प्रवाशांना दमदाटी करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचारी नेमण्याची मागणी करण्यात येत आहे.

मंगळवारी इंद्रायणी एक्‍स्प्रेसमध्ये एका महिला प्रवाशाला “पासहोल्डर’ महिलेने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. पीडित महिला दररोज लोणावळा-पुणे-लोणावळा प्रवास करते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास महिलांच्या राखीव डब्यात एक महिला आसनावर जागा अडवून झोपली होती. तिला विनंती केली असता त्यांच्यात बाचाबाची झाली. असे प्रसंग वारंवार घडत असल्याने प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे.

तर, यापूर्वी प्रगती एक्‍स्प्रेसमध्ये एका पुरुष प्रवाशाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, प्रगती आणि इंद्रायणीमधील दोन्ही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. “पासहोल्डर’ची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून आसनांवर झोपणे, बेताल वागणे, खिडकी उघडी किंवा बंद करणे, ठराविक आसने पकडून ठेवणे आदी प्रकार वाढल्याचे दिसून येते. “पासहोल्डर’कडून मारहाण होण्याचे प्रकार यापूर्वीही घडले असून रेल्वे प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

“पासहोल्डर’ प्रवाशांनी रेल्वेमध्ये दमदाटी केल्यास प्रवाशांनी तातडीने तक्रार करावी. पुणे-लोणावळा लोकलमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला जवान तैनात आहेत. महिला कर्मचाऱ्यांची संख्या पुणे विभागामध्ये कमी असल्याने, इंटरसिटी एक्‍स्प्रेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे नियोजन सुरू आहे.
– सी.एस.चेंगप्पा, सहायक सुरक्षा आयुक्त, आरपीएफ 

Leave A Reply

Your email address will not be published.