खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट

“आरटीओ’कडून नियमबाह्य भाडे आकारणीकडे दुर्लक्ष; सर्व सामान्यांच्या खिशाला झळ

पिंपरी – रविवार आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागून आल्याने प्रवाशांनी दिवाळीनिमित्ताने गावाला जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. एसटी आणि रेल्वेचे आरक्षण कोटा पूर्ण झाल्याने नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आहे. मात्र याच अडचणीचे भांडवल करीत खासगी ट्रॅव्हल्सकडून अवाच्या-सव्वा भाडे आकारले जात असून एकप्रकारे लूट केली जात आहे. याकडे पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाने सपशेल दुर्लक्ष केले असल्याने प्रवाशांना तक्रार करावी तर कुणाकडे असा प्रश्‍न पडला आहे.

दिवाळीच्या तोंडावर गावाकडे जाण्यासाठी अनेकांचा ओढा असतो. शहरातून मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात व कोकण आदी भागात बसची मोठी मागणी असते. एसटी, रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांना खासगी बसकडे नाइलाजास्तव वळावे लागते.

खासगी बसचालकाने निश्‍चित केलेल्या दरांपेक्षा जादा आकारणी करू नये, असा सर्वसाधारण नियम आहे. म्हणजेच “एसटी’ च्या दरापेक्षा साधारण दीडपट दर खासगी ट्रॅव्हल्स वाढवू शकतात. मात्र, या नियमांना हरताळ फासला जात आहे. सामान्य नागरिकांना त्याची माहिती नसल्याने आणि गरज असल्याचे पाहून त्यांना चढ्या दराने तिकीट विक्री केली जाते.

काही ट्रॅव्हलस ऑनलाइन “फुल्ल’ असल्याचे सांगून जादा दराने त्याचे पैसे घेतले जात आहेत. यावर कोणाचेही नियत्रंण नसून, आरटीओ कार्यालयाकडून फक्‍त तक्रार आल्यावरच कारवाई करण्यात येईल, असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच तक्रार आल्यास अशा खासगी ट्रव्हल्सवर थेट कारवाईच्या सूचना दिल्या असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सुविधा
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाय-फाय, पाण्याची बाटली, चार्जर अशा विविध सोयी पुरविण्यात येतात. तर, चिंचवड येथील एका कंपनीने जेवण व नाष्टाही तिकीट दरातच दिला जात असल्याचे सांगितले. यामुळे ग्राहकांना आकर्षित केले जात आहे; परंतु हे या सुविधा देणाऱ्या तिकिटाचा दर न परवडणाऱ्या नागरिकांची मात्र कुचंबना होत आहे. कुटुंबासोबत गावी जाण्यासाठी अर्धा पगार किंवा पूर्ण बोनस तिकिटामध्ये घालविण्याची वेळ काही चाकरमान्यांवर आल्याने नागरिक संताप व्यक्‍त करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.