लिटमस टेस्टमध्ये आमदार पिचड डिस्टिंक्‍शनने उत्तीर्ण

प्रा. डी. के. वैद्य
अकोले – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी “लिटमस टेस्ट’ असणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार वैभवराव पिचड हे डिस्टिंक्‍शनमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघात पिचड पिता-पुत्रांचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत कायम टिकून राहिला असल्याचे निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघांत ‘विखे फॅक्‍टर’ प्रभावी ठरला असताना अकोले विधानसभा मतदार संघात मात्र पिचड फॅक्‍टरच प्रभावी ठरला.

अकोले विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना 81 हजार 165 मते मिळाली तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना 49 हजार 514 मते मिळाली. अकोल्याचे व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना 10 हजार 400 मते मिळाली. अकोले तालुक्‍याने आ. कांबळे यांना 31 हजार 651 मतांची भरघोस आघाडी दिली. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची यंत्रणाही त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये मताधिक्‍यकामी कमी पडली. संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे या ठिकाणी युतीला मोठे बळ मिळाले. “मोदी लाटे’त व त्याला जोडून “विखे फॅक्‍टर’नेही या तालुक्‍यांमध्ये व विधानसभा मतदारसंघात आपला वरचष्मा गाजवला.

2009 साली रामदास आठवले हे आघाडीचे उमेदवार होते. त्यांना शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जोरदार टक्कर दिली होती. तेव्हा अकोले विधानसभा मतदारसंघात रामदास आठवले यांना अशीच आघाडी मिळाली होती, तेव्हा अकोल्याचे भाऊसाहेब वाकचौरे हे पिचड प्रभावामुळे त्यांना आघाडी मिळाली नव्हती. मात्र 2014 साली सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेचे उमेदवार असताना पिचड प्रभाव पडला नाही. तेव्हा सदाशिव लोखंडे यांना नाममात्र आघाडी मिळाली होती.कालच्या मताधिक्‍याने पिचड पिता पुत्राची सल निश्‍चितपणे पुसली गेली असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

आ.पिचड यांनी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा कसोशीने प्रचार केला. चाळीसगाव आदिवासी डांगाण परिसर, अकोले तालुक्‍याबरोबरच संगमनेर तालुक्‍यातील विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गावांमध्ये खासदार लोखंडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा धारण करीत आ.पिचड यांनी केंद्र व राज्य सरकारला प्रचारामध्ये लक्ष बनवले. दुष्काळी तालुका जाहीर न करण्यामध्ये सरकार जितके दोषी राहिली तितके खा. लोखंडे त्याला जबाबदार राहीले अशा प्रकारचा प्रचार त्यांनी केला. त्याचा परिणाम 31 हजार 651 मतांची बेगमी आ. पिचड हे मताधिक्‍याच्या रूपात गोळा करू शकले.

आगामी पाच महिन्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आ. पिचड हे हाताच्या “पंजा’ला मते मागत होते. असा मतांचा जोगवा गोळा करताना आगामी पाच महिन्यांनी आपल्याला स्वतःसाठी “घड्याळा’ला मते मागावयाची आहेत. याकडेही त्यांनी कानाडोळा केला. असा प्रसंग असूनही त्यांनी ह्या वेळेला “आघाडीचा धर्म’ पाळीत आपली होणारी गोची सहन केली. आणि सोबतीला माजीमंत्री मधुकरराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादी किसान सेलचे प्रांतिक उपाध्यक्ष मधुकरराव नवले, त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, पक्षाचे अध्यक्ष गिरजाजी जाधव, सेक्रेटरी यशवंत आभाळे व अन्य कार्यकर्ते आ. पिचड यांनी सातत्याने सजग व सतर्क ठेवले.

त्यांनी तालुका अक्षरशः पिंजून काढला. त्याचं फलित म्हणून ही आघाडी ते मिळवू शकले. अकोले तालुक्‍यात याही वेळेस मतांची बेगमी गोळा करण्यासाठी अकोल्याचे पुत्र व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अल्प स्वरूपात प्रयत्न केले. त्यांना 10 हजार 400 मते मिळाली. निवडणुकीच्या प्रारंभी विजयाचा दावा करणारे खासदार वाकचौरे नंतर मात्र हळूहळू आपला प्रचार व यंत्रणा गुंडाळून शांत बसले.आणि मग त्यांच्या विजयाचे स्वप्न त्यांच्या अनामत रक्कम जप्त होण्यामध्ये झाली नाही झाली तर नवल वाटण्यासारखी गोष्ट राहिली नाही.

आघाडीच्या विरुद्ध महाआघाडी ही ठामपणे आ. कांबळे यांच्या विरोधात उभी ठाकली होती. मात्र शिवसेनांतर्गत असणारी गटबाजी, पक्षांतर्गत असणारी दुहीची बीजे हे निवडणूक काळातच उगवली. आणि त्याचा परिणाम लोखंडे यांचे मताधिक्‍य घटण्यामध्ये झाला. शिवाय खा. लोखंडे यांनीही गेल्या साडेचार वर्षात विरळ व दुर्मिळ दर्शन देत मतदारांना नाराज ठेवले. त्यामुळे त्यांनीच आपले नुकसान करून घेतले. त्याचा परिणाम त्यांचे मताधिक्‍य घटण्यामध्ये झाला. याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी प्रतिक्रिया देताना अकोले तालुक्‍यामध्ये मोठ्या प्रमाणावर धनलक्ष्मीचा प्रभाव पडला किंबहुना धनशक्तीचा हा पगडा मताधिक्‍य वाढण्यामध्ये झाला, असा पिचड यांच्यावर आरोप केला.

आगामी काळात विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी आ. वैभवराव पिचड यांनाच राहणार आहे हे निश्‍चित. त्यांचा लढा हा दुरंगी, तिरंगी की बहुरंगी होणार? हे आगामी काळात निश्‍चित होणारे असले तरी आज मात्र आगामी विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार कांबळे यांना 31 हजार 651 मतांची आघाडी देऊन विशेष नैपुण्याने (डिस्टिंक्‍शनने) ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आगामी काळातही त्यांचा हा दबदबा कायम राहील, अशा प्रकारचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×