पाटणा : माजी केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. ते केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे काका आहेत. माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या लोक जनशक्ती पक्षात फूट पडली. त्यासाठी पारस आणि चिराग या काका-पुतण्यामधील संघर्ष कारणीभूत ठरला.
लोजपमधील फुटीनंतर काका आणि पुतण्याच्या नेतृत्वाखाली पक्षाचे स्वतंत्र गट अस्तित्वात आले. प्रथम पारस भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग बनले. त्यामुळे त्यांची काही काळासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. मात्र, मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपने चिराग यांना साथीला घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेले पारस एनडीएमधून बाहेर पडले. आता बिहारमधील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.
अशात पारस आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांची शनिवारी भेट झाली. त्या भेटीनंतर तेजस्वी यांनी पारस लवकरच महाआघाडीचा भाग बनणार असल्याचे संकेत दिले. विरोधकांच्या महाआघाडीत कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचाही समावेश आहे. आता त्या महाआघाडीत पारस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षही सहभागी होईल.