शाहीनबाग आंदोलनासंदर्भात भाजपाच्या खासदाराचे धक्कादायक वक्तव्य
नवी दिल्ली : शाहीनबागमध्ये लाखो लोक जमतात. ते उद्या तुमच्या घरात घुसतील, ते तुमच्या बहिणी आणि मुलींवर बलात्कार करतील. तेव्हा आजच वेळ आहे. मोदीजी आणि अमित शहा उद्या वाचवायला येणार नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे खासदार पर्वेश वर्मा यांनी केले. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
दरम्यान जाहीर सभेतही त्यांनी शाहीनबाग आंदोलनावर आगपाखड केली. शाहीनबाग या आंदोलनाची जागा रिकामी करायला भारतीय जनता पक्षाला केवळ एक तास लागेल, अशी धमकीच भारतीय जनता पक्षाचे खासदार पर्वेश वर्मा यांनी दिली.
जर भाजपा 11 फेब्रुवारीला सत्तेवर आला तर शाहीबाग निदर्शने आणि निदर्शक केवळ एका तासात स्वच्छ करू. इथे एक माणुसही दिसणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना विजयी करा, असे आवाहन वर्मा यांनी केले आहे.
दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर सरकारी जागेवरील सर्व मशिदी एका महिन्यात उद्ध्वस्त करू,असे वर्मा म्हणाले.