पर्वती मतदारसंघातील महिलांचा निर्धार
पर्वती – रांगोळ्यांच्या पायघड्या, घरोघरी होणारे औक्षण आणि आपुलकीने केली जाणारी विचारपूस अशा भावनाशील वातावरणात अश्विनी कदम यांचे सहकारनगर पद्मावती भागातील महिलांनी स्वागत केले, यावेळी आमचंही ठरलंय असे सांगत, पर्वती कन्या अश्विनी कदम यांना विधानसभेसाठी निवडून देण्याचा निर्धार केला असल्याच्या भावना या भागातील महिला मतदारांनी व्यक्त केल्या. यावेळी महिलांकडून आपुलकीने त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार कदम यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 35, सहकारनगर-पद्मावती भागातील दाते बसस्टॉप शिंदे हायस्कूल परिसर, किरण सोसायटी परिसर, सुवर्ण सोसायटी परिसर, तळजाई परिसर, भिकाजी बापू भोसले समाजमंदिर मागील परिसर, ओम मित्र मंडळ परिसर, म्हसोबा मंदिर रोड परिसर, ल्यूकड शाळा परिसर, वनशिव वस्ती रोड परिसर या भागांत पदपात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा राष्ट्रवादीचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांच्या घराच्या परिसरातही काढण्यात आली.
यावेळी कदम यांनी महिलांशी संवाद साधत पर्वती कन्या म्हणून साथ देण्याचे भावनिक आवाहन केले. तसेच, तुम्ही विकासासाठी एक पाऊल पुढे या, मी तुमच्यासाठी आणि पर्वती मतदारसंघाच्या विकासासाठी दहा पाऊले पुढे येण्यास सदैव तयार आहे असे सांगत, विधानसभेसाठी संधी देण्याचे आवाहन केले.