पुणे (प्रतिनिधी) : गुलटेकडी परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहत इंदिरानगरमधील महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीचे एसआरए अंतर्गत त्याच जागेवर पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. मीनाताई ठाकरे वसाहत, मुकुंदनगर, महर्षीनगर, प्रेमनगर परिसरात मिसाळ यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मिसाळ बोलत होत्या.
यावेळी माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, प्रविण चोरबेले, राजश्री शिळीमकर, निखिल शिळीमकर, गणेश शेरला, रेणुका पाठक, श्रीकांत पुजारी, राहुल गुंड, श्वेता होनराव, बाळासाहेब शेलार यांचा प्रमुख सहभाग होता.
मिसाळ म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाची नियमावली निर्मिती प्रक्रिया खंडित झाली होती. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मी सातत्याने पाठपुरावा करून एसआरएची नियमावली मंजूर करून घेतली. महापालिकेच्या ज्या जागांवर झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन महापालिकेने करावे ही आग्रही मागणी मान्य झाली. त्यानुसार एसआरएचा प्रायोगिक तत्त्वावरील पहिला प्रकल्प गुलटेकडी येथे सुरू होत आहे.
नेहरू रस्ता आणि महर्षीनगरमध्ये तब्बल १२ एकर जागेवर मीनाताई ठाकरे इंदिरानगर ही मोठी वसाहत आहे. जागेची मोजणी, डिमार्केशन आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये दोन हजार ५५४ झोपड्या आढळून आल्या असून, त्यांचे जागेवरच पुनर्वसन होणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले.